मधुकर ठाकूर
उरण - ग्रामपंचायत निवडणूक आणि मतमोजणीमुळे ८ डिसेंबर रोजी होणारी करंजा मच्छीमार सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक आता २४ डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शिरिष सकपाळ यांनी दिली.
राज्यातील सर्वात मोठी आणि बलाढ्य संस्था अशी ओळख असलेल्या करंजा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक १८ डिसेंबर रोजी जाहीर झाली होती. वार्षिक सुमारे ५० कोटींची उलाढाल असलेल्या संस्थेचे एकूण ३८१२ मतदार आहेत.३८१२ मतदार १७ संचालकांची गुप्त मतदानाने निवड करणार आहेत.यामध्ये दोन महिला संचालकांचा समावेश आहे.
याआधी २०१५ रोजी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. २०२०-२१ मध्ये संस्थेची मुदत संपुष्टात आली आहे. मात्र कोरोना महामारीमुळे सुमारे दोन वर्ष निवडणूक लांबणीवर पडली होती. मात्र मुदत वाढीनंतरही १८ डिसेंबर रोजी मतदानाची तारीखही जाहीर करण्यात आली होती.मात्र ग्रामपंचायत निवडणूक आणि मतमोजणीमुळे १८ डिसेंबर रोजी होणारी करंजा मच्छीमार सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.ही निवडणूक आता २४ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.दरम्यानच्या काळात उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघार यामध्ये १७ पैकी ८ संचालक पदाच्या जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. उर्वरित नवापाडा,कोंढरीपाडा, कासवले पाडा येथील ९ जागांसाठी २४ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य मत्स्यव्यवसाय विभागाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकारी संस्थेचे उपनिबंधक शिरिष सकपाळ यांनी दिली.