कर्जत-कल्याण राज्यमार्ग वाहतुकीस धोकादायक

By Admin | Published: July 5, 2017 06:39 AM2017-07-05T06:39:56+5:302017-07-05T06:40:52+5:30

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर कर्जत ते नेरळ दरम्यान मोठमोठे खड्डे पडले असून, काही भागांत रस्त्याची अक्षरश: दयनीय अवस्था झाली

Karjat-Kalyan Highway is dangerous for traffic | कर्जत-कल्याण राज्यमार्ग वाहतुकीस धोकादायक

कर्जत-कल्याण राज्यमार्ग वाहतुकीस धोकादायक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत-कल्याण राज्यमार्गावर कर्जत ते नेरळ दरम्यान मोठमोठे खड्डे पडले असून, काही भागांत रस्त्याची अक्षरश: दयनीय अवस्था झाली आहे. पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या रस्त्यावर एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे; परंतु या रस्त्यावरील खड्डे कधी भरणार? असा प्रश्न वाहनचालकांना पडला असून, बांधकाम विभागाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे.
कर्जत-कल्याण राज्यमार्गाच्या चौपदरीकरणाचे काम कोट्यवधी
रुपये खर्च करून मुंबई विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून २०१४मध्ये पूर्ण करण्यात आले होते; परंतु दोन वर्षांतच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले. मागच्या वर्षी एमएमआरडीएने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत यांच्याकडे वर्ग केल्याने मागील वर्षी कर्जत बांधकाम विभागाने या रस्त्यावर खड्डे भरण्याचे काम केले होते; परंतु यावर्षीही पावसाळ्यात या राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याने हे खड्डे भरत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.
या मार्गावरील किरवली, डिकसळ, वडवली, बेकारे, नेरळ पेट्रोलपंप, दीपक हॉटेल, नेरळ विद्यामंदिर परिसर, दामत अशा अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने हे खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती कधी होणार? असा प्रश्न प्रवासी व चालकांकडून विचारला जात आहे. तसेच डिकसळ गावाजवळील दुकानांसमोरील अर्धवट गटारे ठेवल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. तसेच या गटारांची कामे अर्धवट केल्याने रस्त्याच्या कडेला कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. याच रस्त्यावरील डिकसळ येथीलच भाऊसाहेब राऊत विद्यालयाच्या संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण ठेवण्यात आले आहे. ही सर्व कामे पूर्ण करावीत, अशी मागणीदेखील अनेक वर्षांपासून होत आहे. यासाठी डिकसळ ग्रामस्थांनी अनेक वेळा पाठपुरावाही केला आहे; परंतु याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. तरी बांधकाम विभागाने या राज्यमार्गावरील अनेक अर्धवट असलेली कामे पूर्ण करावीत, तसेच कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील अनेक ठिकाणी पडलेले खड्डे लवकरात लवकर भरावे, अशी मागणी प्रवासी-वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

कर्जत-कल्याण राज्यमार्गावर खड्डे भरण्यासाठी मंजुरी प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. नवीन सिस्टीमप्रमाणे अ‍ॅन्युएल मेन्टन्स कॉन्ट्रॅक्ट आॅनलाइन टेंडर निघणार आहेत. प्रस्ताव मंजूर झाल्यावर वर्कआॅर्डर होईल. त्यानंतर पावसाळ्यात व दिवाळीत असे दोन वेळा संबंधित ठेकेदार खड्डे भरणार आहे. दहा-पंधरा दिवसांत काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- चंद्रशेखर सहनाल, उप अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जत

कर्जत-कल्याण राज्यमार्गावरील अनेक ठिकाणी पडलेले खड्डे लवकर भरावे, अशी मागणी प्रवासी-वाहनचालक आणि स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

कर्जत ते नेरळपर्यंत या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. वाहकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे बांधकाम विभागाने लवकरात लवकर खड्डे भरावेत.
- भगवान कराळे,
स्थानिक ग्रामस्थ

Web Title: Karjat-Kalyan Highway is dangerous for traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.