कर्जत-नेरळ-कल्याण राज्यमार्ग धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:16 PM2019-08-28T23:16:01+5:302019-08-28T23:17:13+5:30
कल्याण रस्त्याने नेरळ येथे येत असताना शेलू गावाच्या हद्दीत झालेल्या प्रचंड पावसामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील मातीचा भराव वाहून गेला होता.
नेरळ : कर्जत-नेरळ-कल्याण या राज्यमार्ग रस्त्यावर ठाणे जिल्हा हद्दीपासून दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण नुकतेच करण्यात आले होते. त्या रस्त्यावरील शेलूनजीक असलेल्या रस्त्याचा मातीचा भराव वाहून गेला आहे. दरम्यान, रात्री त्या ठिकाणी वाहनचालकांना वाहने चालविताना समजून येत नसल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे.
कल्याण रस्त्याने नेरळ येथे येत असताना शेलू गावाच्या हद्दीत झालेल्या प्रचंड पावसामुळे मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील मातीचा भराव वाहून गेला होता. त्यानंतर तब्बल दोन दिवस म्हणजे ४८ तास मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील वाहतूक ठप्प झाली होती. त्याच परिसरातून कल्याण रस्ता नेरळ येथे येत असून रस्त्याचा मातीचा भराव मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. त्याबाबत शेलू येथील पोलीस पाटील मनोज पाटील यांनी नेरळ पोलीस ठाणे आणि कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी त्या भागात वाहनचालकांना रस्त्याच्या वाहून गेलेल्या भागाची माहिती होत नाही.
त्यात त्या ठिकाणी असलेले वळण लक्षात घेता नेरळकडील वाहने ही थेट रस्त्याखाली जाऊन शेतात कोसळू शकतात. अशी स्थिती निर्माण झाली असून त्याबाबत गेल्या २० दिवसांत सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतेही काम त्या भागात केले नाही. पोलीस पाटील असलेले स्थानिक कार्यकर्ते मनोज पाटील यांनी त्या भागात सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या मातीने भरून त्यावर पांढरा रंग लावून त्या सर्व पिशव्या त्या भागातील धोक्याची माहिती देण्यासाठी लावल्या होत्या. मात्र, सततच्या पावसामुळे त्या पिशव्या कोसळल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी पुढे रस्त्याचा भाग वाहून गेला असल्याची माहिती देणारे फलक लावण्याची गरज आहे, तसेच रात्री चकाकणाऱ्या रेडियमची पट्टी त्या ठिकाणी लावून ठेवल्यास वाहनचालकांना त्या भागातील धोक्याची माहिती मिळू शकेल.
वाहने रात्रीच्या वेळी रस्त्याखाली जाऊ शकतात, याची कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागाला असतानाही कोणत्याही प्रकारचे खबरदारीचे उपाय बांधकाम विभाग करीत नसल्याने स्थानिक नाराजी व्यक्त करीत आहेत. त्या ठिकाणी तत्काळ मातीचा भराव करून रस्त्याचे आणखी नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे; पण प्रशासन सुस्त असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
रस्त्यावर किंवा अन्य भागात कोणत्याही प्रकारचे अपघात झाल्यानंतर आम्हाला तरुणांना सोबत घेऊन जावे लागते. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊन धावपळ करावी लागू नये, यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे.
- मनोज पाटील,
पोलीस पाटील, शेलू
आम्हाला शेलू येथील रस्त्याचा नेरळ बाजूकडील रस्ता धोकादायक झाल्याची माहिती आहे, त्यानुसार या रस्त्याचे काम करणाºया ठेकेदाराला त्याबाबत माहिती देण्यात आली असून, तत्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
- अजयकुमार सर्वगोड,
उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग