कर्जत-नेरळ सिग्नल यंत्रणा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:41 AM2019-08-05T00:41:02+5:302019-08-05T00:41:30+5:30
मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत
नेरळ : शुक्रवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. रेल्वेने रविवारी काही भागात दुरुस्तीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतला आहे. मात्र कल्याण-कर्जत भागात असा कोणताही ब्लॉक घेण्यात आला नव्हता. मात्र पूर्ण सिग्नल यंत्रणा ही बंद करून ठेवण्यात आली होती. सिग्नलचे खांब ब्लॅक आऊट झालेले दिसत होते.
शनिवारी देखील कर्जत लोकल तासभर उशिरा धावत होत्या आणि त्या कल्याण तर कधी ठाणे नावाने पुढे सरकत होत्या. शनिवारी रात्री तर पावसाचा प्रचंड जोर होता, त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक थांबविण्यात आली होती. रविवारी सकाळी उपनगरीय लोकलची सेवा बंद असल्याची उद्घोषणा होत होती. त्याचवेळी सकाळपासून मध्य रेल्वेची सिग्नल यंत्रणा देखील बंद ठेवण्यात आली होती. आणीबाणीच्या काळात सिग्नल यंत्रणा पूर्ण पणे ब्लॅक आऊट केली जाते. त्याप्रमाणे सिग्नलच्या खांबावर लाल, पिवळे, हिरवे असे कोणत्याही रंगाचे दिवे पेटलेले दिसत नव्हते. त्यामुळे अशी अद्भुत परिस्थिती पाहून मुंबईच्या लोकलची प्रतीक्षा करणारे असंख्य पर्यटक हे कर्जत,नेरळ स्थानकात तासनतास बसून होते. त्यात मध्य रेल्वेकडून वाहतूक बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत असल्याने प्रवासी आणि पर्यटक यांचा जीव धस्स झाला होता. मात्र शनिवारपासून पाऊस सुरू असल्याने स्थानिक कोणी प्रवासी अडकून पडले नसल्याचे चित्र सर्व स्थानकात आहे; परंतु पर्यटक मात्र अडकून पडले होते.