गृहराज्यमंत्र्यांनी केली कर्जत पोलीस वसाहतीची पाहणी
By admin | Published: June 22, 2017 12:22 AM2017-06-22T00:22:17+5:302017-06-22T00:22:17+5:30
राज्याचे गृहराजमंत्री दीपक केसरकर हे एका कार्यक्रमानिमित्त कर्जतमध्ये आले होते. त्या वेळी त्यांनी कर्जत शहरात असलेल्या पोलीस वसाहतीची पाहणी केली
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : राज्याचे गृहराजमंत्री दीपक केसरकर हे एका कार्यक्रमानिमित्त कर्जतमध्ये आले होते. त्या वेळी त्यांनी कर्जत शहरात असलेल्या पोलीस वसाहतीची पाहणी केली. ज्या वसाहती दुरु स्त करता येतील, त्या दुरुस्त केल्या जातील. मात्र, पोलीस कर्मचाऱ्यांना मालकीची घरे देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार, असे त्यांनी सांगितले.
कर्जत पोलीस ठाण्यात सुमारे ५५ पोलीस कर्मचारी आहेत, कर्जतमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पाच वसाहती आहेत, त्यापैकी दोन वसाहती या कर्जतच्या टेकडीवर आहेत. मात्र, त्या सध्या वापरात नाहीत. तीन वसाहती या कर्जत पोलीस ठाण्याच्या आजूबाजूला आहेत. त्यापैकी दोन वसाहती या ब्रिटिशकालीन आहेत. पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेली वसाहत १८७१ साली बांधण्यात आली आहे. त्या वसाहतीमध्ये आठ खोल्या आहेत. तर पोस्ट आॅफिस जवळ असलेली पोलीस वसाहत ही १८८७ साली बांधण्यात आली आहे. त्या ठिकाणी आठ खोल्या असून, त्यापैकी तीन खोल्या वापरात आहेत. या वसाहतीत तीन खोल्यांमध्ये कर्मचारी राहतात. मात्र, वसाहतीच्या बाजूला महाकाय वृक्ष वाढला आहे. त्याच्या फांद्या वसाहतीवर आल्या आहेत. त्या वादळी वाऱ्यात कधीही वसाहतीवर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या वसाहती आहेत. मात्र, त्या अनेक सोयींनी वंचित आहेत.
तिसरी वसाहत ही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या मागे आहे. या इमारतीचे कामे १९८४मध्ये करण्यात आले आहे. या इमारतीमध्ये १३ खोल्या आहेत. मात्र, या इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे आहे की त्या इमारतीची अवस्था दयनीय आहे. कसेबसे पाच कर्मचारी या इमारतीमध्ये राहत आहेत. त्या ठिकाणी कसली सोय नसल्याने पोलीस कर्मचाऱ्याला भाड्याने खोली घेऊन राहावे लागत आहे. वसाहतीच्या दुरवस्थेमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. कर्जत येथे खासगी कार्यक्र मासाठी आलेल्या गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांना शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक नितीन सावंत यांनी पोलीस वसाहतीची माहिती दिली.
गृहराज्यमंत्री केसकर यांनी पोलीस वसाहतीची पाहणी केली. या वेळी रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नागकुल, कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे आदी उपस्थित होते.