कर्जत पं. समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीला गळती

By admin | Published: June 22, 2017 12:16 AM2017-06-22T00:16:52+5:302017-06-22T00:16:52+5:30

राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिलेल्या निधीमधून तीन कोटी रु पये खर्चून बांधण्यात आलेली

Karjat Pt Leak to the new administrative building of the committee | कर्जत पं. समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीला गळती

कर्जत पं. समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीला गळती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिलेल्या निधीमधून तीन कोटी रु पये खर्चून बांधण्यात आलेली प्रशासकीय इमारत कधी खुली होणार हा प्रश्न आहे. कारण २२ फेब्रुवारी २०१७ रोजी उद्घाटन करण्यात आलेल्या या प्रशासकीय इमारतीमध्ये अद्याप कर्जत पंचायत समितीचा कोणताही विभाग हलविण्यात आला नाही. प्रशासकीय इमारतीमधून कारभार लवकर सुरू करण्याची मागणी तालुक्यातील ग्रामस्थांची असताना, करण्यात येत असलेली चालढकल तालुक्याच्या विकासाला बाधक असल्याचे बोलले जात आहे. मात्र कोट्यवधी रु पये खर्चून पूर्ण करण्यात आलेल्या या इमारतीमधील अनेक भिंतींना स्लॅबमधून होणाऱ्या पाणी गळतीचा सामना करावा लागत आहे. भिंती ओलसर असल्याने पहिल्याच पावसात इमारतीचा स्लॅब गळू लागल्याने उलटसुलट चर्चांना कार्यालयात ऊत आला आहे.
दुमजली असलेल्या कर्जत पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनानंतर नवीन इमारतीत कार्यालये हलविली जातील अशी अपेक्षा होती. मात्र चार महिन्यांचा कालावधी लोटला तरी कर्जत पंचायत समिती आजही गोदामातून कारभार करीत आहे. या कार्यालयात वीजपुरवठा खंडित झाला की संपूर्ण कार्यालयात काळोखाचे साम्राज्य असते. अशावेळी सर्व कारभार बंद ठेवावा लागतो. त्यामुळे कर्जत तालुक्याच्या विविध भागातून येणाऱ्या ग्रामस्थांची कामे पूर्ण होत नाहीत. तालुक्यातील ग्रामस्थांनी अनेकदा तक्र ारी केल्यानंतर कर्जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये कामकाज सुरू करण्यासाठी महापूजा घालण्यात आली या वेळी भिंती ओलसर असल्याचे दिसून आले.
पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी, अधिकारी यांनी हजेरी लावलेल्या १९ जूनच्या नंतर नक्की कधीपासून कारभार सुरू होणार याबद्दल कोणीही ठोस माहिती देत नाही. या इमारतीचे काम करणाऱ्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता ए. ए. केदार यांनी फर्निचरची कामे पूर्ण करायची असल्याचे उत्तर दिले. मात्र या नवीन प्रशासकीय इमारतीच्या भिंती पहिल्याच पावसात ओल्या झालेल्या दिसून येत आहेत. दोन्ही मजल्यावर अनेक भागात भिंती ओलसर असल्याने या इमारतीचा स्लॅब लिकेज आहे काय? याचा शोध आता जिल्हा परिषद बांधकाम विभागाला घ्यावा लागणार आहे.
भिंती ओल्या असल्याने त्या ठिकाणी नवीन फर्निचर लावल्यास ते देखील खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रशासकीय इमारतीमधून नक्की कधी कारभार सुरू होणार हे कोणीही आज सांगू शकत नाही. त्यामुळे महापूजा झाली तरी कार्यालय स्थलांतरित होण्याची तारीख अनिश्चित आहे. आत्ता पुढे काय होणार याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.

तीन कोटी खर्चून कर्जत पंचायत समितीची प्रशासकीय इमारत उभी करण्यात आली असून जिल्हा परिषदेशी संबंधित सर्व सरकारी कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी ही इमारत मदतगार ठरणार आहे.
सध्या कर्जत शहरातील वेगवेगळ्या भागात जिल्हा परिषदेशी संबंधित कार्यालये असून त्यापैकी अनेक कार्यालये ही अनेक वर्षे भाड्याच्या जागेत आहेत. अशी सर्व कार्यालये नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये एकत्र आल्यास कर्जत तालुक्याच्या विविध भागातून येणाऱ्या सर्व ग्रामस्थांना एकाच ठिकाणी आपली कामे करता येणार आहेत.
कर्जत पंचायत समितीच्या २२ फेब्रुवारी २०१७ रोजी उद्घाटन करण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीमध्ये सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, अतिरिक्त गटविकास अधिकारी, शिक्षण, लघु पाटबंधारे,कक्ष अधिकारी, कार्यालय प्रमुख, लेखापाल, विरोधी पक्ष, ग्रामपंचायत विभाग, सामान्य प्रशासन, बांधकाम, आरोग्य, महिला बालविकास, पशुधन, सर्व शिक्षा अभियान अशी सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी प्रशासकीय इमारत बांधली आहे.

Web Title: Karjat Pt Leak to the new administrative building of the committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.