कर्जत पं. स.च्या १२ गणांसाठी आरक्षण
By admin | Published: November 17, 2016 05:46 AM2016-11-17T05:46:45+5:302016-11-17T05:46:45+5:30
पंचायत समितीच्या नव्याने पुनर्रचना करण्यात आलेल्या गणांची सोडत १८ नोव्हेंबर रोजी होत आहे.
कर्जत : पंचायत समितीच्या नव्याने पुनर्रचना करण्यात आलेल्या गणांची सोडत १८ नोव्हेंबर रोजी होत आहे. २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षित जागांकरिता आरक्षण सोडत काढली जाणार आहे. २४ आॅक्टोबर रोजी काढण्यात आलेली आरक्षण सोडत गणांची संख्या वाढल्याने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेने रद्द केली होती.
मागील महिन्यात काढण्यात आलेली आरक्षण सोडत ही १० गणांसाठी काढण्यात आली होती. पनवेल महानगरपालिकेचा निर्णय झाल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेची आणि जिल्ह्यातील काही तालुका पंचायत यांच्यात गणांमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने रायगड जिल्ह्यात झालेली जिल्हा परिषद प्रभाग आणि तालुका पंचायत समितीच्या २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १८ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. अनुसूचित जाती-जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला राखीव गण निश्चित करण्यासाठी ही सोडत काढली जाणार आहे. कर्जत चार फाटा येथील कृषी संशोधन केंद्राच्या सभागृहात ही सोडत सकाळी ११ वाजता काढली जाणार असल्याची माहिती कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी दिली.
कर्जत तालुक्यात १९९२ नंतर पुन्हा कर्जत पंचायत समितीच्या १२ गणांसाठी २०१७ मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. जुने सर्व प्रभाग फोडून तयार झालेल्या कर्जत पंचायत समितीच्या १२ गणांची सोडत पूर्णपणे नवीन होणार की मागील १५ वर्षांतील निवडणुकीचा आधार घेऊन आरक्षण सोडत काढली जाणार? याबाबत कर्जत तालुक्यातील सर्व राजकारणी यांच्यात कुतूहल निर्माण झाले आहे.
18 नोव्हेंबर रोजी रायगड जिल्ह्यात झालेली जिल्हा परिषद प्रभाग आणि तालुका पंचायत समितीच्या २०१७ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. कर्जत चार फाटा येथील कृषी संशोधन केंद्राच्या सभागृहात ही सोडत सकाळी ११ वाजता काढली जाणार आहे.