कर्नाळा बँकेचे संचालक अभिजित पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
By वैभव गायकर | Published: June 10, 2023 05:22 AM2023-06-10T05:22:33+5:302023-06-10T05:23:28+5:30
घोटाळेबाजांना दणका मिळाला आहे.
लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: कर्नाळा बँकेचे संचालक अभिजीत विवेकानंद पाटील यांचा बँक गैरव्यवहारप्रकरणी सक्रिय सहभाग दिसून येत असल्याने पनवेलचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांनी शुक्रवारी दि. 9 त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.
न्यायालयीन कोठडीत असलेल्या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अपर्णा वडके यांचाही नियमित जामीन अर्ज या वेळी फेटाळण्यात आला. त्यामुळे घोटाळेबाजांना दणका मिळाला आहे.
कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्यात आपल्याला अटक होऊ नये यासाठी अभिजीत विवेकानंद पाटील यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. न्यायालयीन कोठडीत असलेल्या अपर्णा वडके यांनीही पनवेलच्या जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज केला होता. यावर सुनावणी झाली. घोटाळ्याची व्याप्ती पाहता सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयराम वडणे यांनी दोन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. या निर्णयाचे ठेवीदारांनी स्वागत केले आहे.