- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : सध्या पावसाळ्याचे दिवस असले तरी वरुणराजाची अद्याप अपेक्षित कृपा झालेले नाही. त्यामुळे पावसाळी पिकनिक स्पॉट ओस पडले आहेत. तसेच आजूबाजूचे धबधबे कोरडे ठणठणीत आहेत. अशा परिस्थितीत सुट्टीच्या दिवशी अनेक जण कर्नाळा अभयारण्याला पसंती देताना दिसत आहेत. रविवारी अभयारण्यात एक हजारांपेक्षा जास्त पर्यटकांनी हजेरी लावली. त्यामुळे हा परिसर पर्यटकांनी फुलून गेल्याचे दिसून आले.पनवेल शहरापासून १२ कि.मी. अंतरावर असलेले अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य त्याचबरोबर विविध प्रकारच्या वृक्षवेली व पक्ष्यांनी समृद्ध असे कर्नाळा अभयारण्य आहे. मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेल्या या कर्नाळा अभयारण्यास मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पर्यटकांची संख्या जास्त असते. जून महिना सुरू झाल्यानंतर या ठिकाणची गर्दी ओसरते. मात्र, यावर्षी जून महिना संपत आला तरी पावसाचे अपेक्षित आगमन झालेले नाही.संपूर्ण जून महिना पावसाने हुलकावणी दिल्याने परिसरातील धबधबे कोरडे पडले आहेत. त्यामुळे विशेषत: तरु णाईची निराशा झाली आहे. याचा परिणाम म्हणून ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पनवेल येथील पर्यटकांनी शनिवार, रविवार कर्नाळा अभयारण्याला पसंती दिली. रविवारी सकाळपासूनच या ठिकाणी तिकिटासाठी महामार्गापर्यंत रांगा लागल्या होत्या. शेकडो जणांनी कर्नाळा किल्ल्यावर जाऊन पर्यटनाचा आनंद लुटला. अभयारण्यात असलेले चिल्ड्रन पार्कही लहान मुलांनी भरले होते.वनभटकंती केल्यानंतर महिला बचतगटाच्या उपाहारगृहात अनेकांनी भोजनावर ताव मारला. या उपाहारगृहात खवय्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. निरामय शांतता, वनराईच्या सानिध्यात आणि त्यात स्वादिष्ट जेवणाची भर टाकल्याने आनंद द्विगुणित होत असल्याची प्रतिक्रि या पर्यटकांनी ‘लोकमत’कडे नोंदवली. संध्याकाळपर्यंत ११००च्या वर पर्यटकांनी कर्नाळा अभयारण्यास भेट दिल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.वॉटरपार्कवरही गर्दीरविवार सुट्टीचा दिवस आणि त्यातल्या त्यात पावसाने दांडी मारल्यामुळे कर्नाळा अभयारण्य परिसरातील रिसोर्ट, वॉटरपार्क, हॉटेल्स त्याचबरोबर फार्म असलेल्या ठिकाणी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली. त्यामुळे हा परिसर रविवार सकाळपासूनच गजबजलेला दिसून आला.
कर्नाळा अभयारण्य पर्यटकांनी फुलले, पाऊस लांबणीवर गेल्याने निवडला पर्याय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 1:49 AM