‘काही तरी कर पनवेलकर’ मोहिमेचे सिडकोत पडसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2016 02:37 AM2016-03-31T02:37:31+5:302016-03-31T02:37:31+5:30
पनवेल परिसरातील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. नियोजनाअभावी ऐतिहासिक शहराला विविध समस्यांनी घेरले आहे. याची दखल घेत ‘लोकमत’ने ‘काही तरी कर पनवेलकर’
नवी मुंबई : पनवेल परिसरातील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. नियोजनाअभावी ऐतिहासिक शहराला विविध समस्यांनी घेरले आहे. याची दखल घेत ‘लोकमत’ने ‘काही तरी कर पनवेलकर’ या सदराखाली परिसरातील सोयी-सुविधांचा लेखाजोखा मांडला आहे. मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या ‘लोकमत’च्या या मोहिमेचे तीव्र पडसाद सिडकोत उमटले. त्यानुसार सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेंद्र चव्हाण यांनी या परिसरातील पायाभूत सुविधांचा आढावा घेत संबंधित विभागाला तातडीच्या सूचना केल्या आहेत.
पनवेल शहराला ऐतिहासिक वारसा आहे. पनवेल नगरपालिकेला १६४ वर्षांची परंपरा आहे. असे असले तरी परिसराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. रस्ते, वाहनतळ, आरोग्य सुविधा, तलाव, घनकचरा व्यवस्थापन, खेळाचे मैदान, उद्याने,पाण्याचे दुर्भिक्ष, विरंगुळा केंद्र, अग्निशमन यंत्रणा आदी अत्यावश्यक सेवा रसातळाला गेल्या आहेत. पनवेलबरोबरच सिडकोनिर्मित खारघर, कळंबोली आणि कामोठे या परिसरातही या सोयी-सुविधांची वानवा आहे. यासंदर्भातील सविस्तर लेखमाला ‘लोकमत’मधून प्रसिध्द करण्यात येत आहे. या वृत्तमालेचे तीव्र पडसाद पनवेल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले होते. त्यापाठोपाठ सिडकोनेही या वृत्तमालेची दखल घेतली आहे. मंगळवारी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला कळंबोली, खारघर, पनवेल आणि कामोठे परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी तसेच सिडकोचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. वृत्तमालेचा आधारे चव्हाण यांनी उपस्थित नागरिकांची मते जाणून घेतली. त्या त्या विभागातील नागरी समस्यांचा आढावा घेतला. त्यानुसार येत्या काळात त्यांची तातडीने पूर्तता करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. (प्रतिनिधी)