काश्मीरमध्ये पंडितांना हव्या स्वतंत्र वसाहती, काश्मिरी पंडित असोसिएशनची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 01:48 AM2019-08-11T01:48:59+5:302019-08-11T01:49:28+5:30
काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना काश्मिरात वास्तव्यासाठी स्वतंत्र्य वसाहती हव्या आहेत. केंद्र शासनाने कलम ३७०, ३५ अ रद्द केल्यानंतर काश्मिरी पंडितांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- वैभव गायकर
पनवेल - काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांना काश्मिरात वास्तव्यासाठी स्वतंत्र्य वसाहती हव्या आहेत. केंद्र शासनाने कलम ३७०, ३५ अ रद्द केल्यानंतर काश्मिरी पंडितांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. १९९० दरम्यान काश्मीरमधून विस्थापित झाल्यानंतर या समुदायाने कठीण परिस्थितीला तोंड दिले आहे.
केंद्र सरकारने केलेल्या नव्या कायद्यानुसार, या सर्वांना मातृभूमीत परतण्याची संधी मिळणार आहे. काश्मीरमधून विस्थापित झाल्यानंतर हा समुदाय दिल्ली, जम्मू, बंगळुरू, फरिदाबाद (हरियाणा), चंदिगड, जयपूर, पुणे, मुंबई आदीसह देशभरातील कानाकोपऱ्यात स्थायिक झाला आहे.
१९९० च्या दरम्यान काश्मीरमधून स्थानिक मुस्लीम रहिवाशांच्या अत्याचाराचे बळी ठरलेली जवळ जवळ तीन लाख कुटुंब काश्मीरमधून स्थलांतरित झाली. यापैकी जम्मूमधील ५२ हजार, तर दिल्लीमधील नऊ हजार कुटुंबीयांची काश्मीरमधून विस्थापित झाल्याची नोंदणी आहे. मात्र, ही संख्या मोठी असल्याचे काश्मिरी पंडित असोसिएशन मुंबईचे चमनलाल रैना यांनी सांगितले. काश्मीरमधील अत्याचाराला बळी ठरलेले लाखो कुटुंब देशभरात विविध राज्यांत आज वास्तव्यास आहेत. या सर्वांशी समन्वय साधूनच केंद्र शासनाने काश्मिरी पंडित रहिवाशांबद्दल पॉलिसी ठरविणे गरजेचे आहे. केंद्र शासनाचा निर्णय स्वागतार्ह असला तरी त्याला खूप विलंब झाल्याचे ८३ वर्षीय चमनलाल रैना सांगतात.
मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या काश्मिरी पंडित रहिवाशांनी काश्मिरी पंडित असोसिएशनची १९७० मध्ये स्थापना केली. सध्याच्या घडीला असोसिएशनमध्ये १२०० कुटुंबांनी नोंदणी केली आहे. पंडिताना काश्मीरमधून हटविण्यासाठी त्या ठिकाणच्या स्थानिकांचा वेगळा अजेंडा होता. काश्मीर राज्याला मुस्लीम राज्य बनविण्यासाठी तत्कालीन मुस्लीम नेत्यांनी स्थानिक मुस्लिमांचे कान भरून काश्मिरी पंडितांना घरे सोडण्यास भाग पाडले असल्याचे रैना सांगतात. हिंसाचाराला आपले कुटुंबीय बळी पडता कामा नये, म्हणूनच लाखो काश्मिरी कुटुंबीयांनी आपली घरे सोडल्याचे काश्मिरी पंडित असोसिएशनचे ट्रस्टी दिलीप भट यांनी सांगितले.
मायभूमीत परतण्याची संधी सरकारने दिली, याकरिता काश्मीरमध्येच स्वतंत्र काश्मीर पंडित वसाहत उभारण्याची गरज आहे. त्या ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारने हाती घेण्याची गरज आहे. काश्मीरमध्ये काश्मीर पंडितांसह डोग्राम, हिंदू, महाजन, शीख आदी अल्पसंख्याक समाजदेखील वास्तव्यास होते, असे चांद भट यांनी सांगितले.
काश्मिरी पंडित काश्मीरचे खरे मालक
काश्मीरमध्ये सुशिक्षित व समृद्ध म्हणून काश्मिरी पंडित ओळखले जात होते. शेकडो हेक्टर बागा, शेतजमीन या काश्मिरी पंडितांच्या नावावर होत्या. मात्र, स्थानिकांनी नियोजनबद्ध पद्धतीने काश्मिरी पंडितांवर अन्याय करून त्यांना काश्मीर सोडण्यास भाग पाडले, असे चमनलाल रैना यांनी सांगितले.
काश्मिरी पंडित असोसिएशनशी समन्वय साधावा
देशभरातील विविध काश्मिरी पंडित समाजाच्या असोसिएशन आजही कार्यरत आहेत. केंद्र शासनाने या असोसिएशनशी समन्वय साधून मसुदा निश्चित करण्याची गरज आहे. तशी मागणी आम्ही केंद्र शासनाला पत्र लिहून करणार असल्याचे चमनलाल रैना यांनी सांगितले.