पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघातील कौल महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:31 PM2019-05-22T23:31:38+5:302019-05-22T23:31:46+5:30
मावळ लोकसभा मतदारसंघ : निकालाबाबत उत्सुकता
- वैभव गायकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : मावळ लोकसभा मतदारसंघ या वेळी मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. शरद पवार यांचा नातू व अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी प्रथमच थेट लोकसभेच्या निवडणुकीद्वारे राजकारणात एंट्री घेतली. पवार कुटुंबीयांसारख्या देशाच्या राजकारणात आपले वेगळे महत्त्व असलेल्या घराण्यातील उमेदवार या मतदारसंघात निवडणूक लढवीत असल्याने सुरु वातीपासून या मतदारसंघाची चर्चा रंगली होती.
सेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना पार्थ यांचे आवाहन आहे. एकूणच या मतदारसंघाचा आढावा घेतल्यास बारणे यांचे पारडे जड वाटत होते. मात्र, थेट पवार घराण्यातील सदस्य या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने हा सामना अतिशय अटीतटीचा झाला आहे. या मतदारसंघातील पनवेल, उरण या दोन विधानसभा अतिशय महत्त्वाच्या आहेत. विशेष म्हणजे, पनवेल विधानसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठी विधानसभा असलेला मतदारसंघ मावळची खासदार निवडण्यात महत्त्वाची भूमिका असणार हे मात्र निश्चित आहे. एकूणच दोन्ही मतदारसंघाचा आढावा घेतल्यास उरणमध्ये मनोहर भोईर हे शिवसेनेचे आमदार आहेत, तर पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर हे भाजपचे आमदार आहेत. मात्र, मागील निवडणुकीच्या वेळी ज्या प्रकारे मोदी लाट अस्तित्वात होती, तरी शेकापचे तत्कालीन उमेदवार व सध्याचे विद्यमान भाजप आमदार यांना पनवेलमधून १३५०० आणि उरणमधून २५५०० मताधिक्य मिळाले होते. २०१४ मध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार तिसऱ्या क्र मांकावर फेकला गेला होता; परंतु या वेळी राष्ट्रवादीसोबत शेकाप आल्याने पार्थ पवार यांना त्याचा फायदा होणार हे निश्चित मानले जाते आहे. पनवेलमध्ये शहरी मतदार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, तर ग्रामीण भागातील मतदार पारंपरिक शेकापचा मतदार असल्याने ती मते थेट राष्ट्रवादीच्या पारड्यात पडतील, असे कयास बांधले जात आहेत. पनवेलमधील अनेक मतदार हा मेट्रोपॉलिटिन असल्याने शहरी मतदार युतीच्या मागे ठामपणे उभा असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.
मावळ लोकसभा मतदारसंघात बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार राजाराम पाटील हेदेखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. मोठ्या प्रमाणात दलित मतदार बहुजन वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभा असल्याचे दिसून आले.
राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची लढत
राष्ट्रवादीने लावलेला जोर, पवार कुटुंबीयांची प्रचारात आघाडी पाहता बारणेंसाठी या वेळची परीक्षा कठीणच असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.
पवार कुटुंबीयांशी असलेले सर्वपक्षीय संबंध, खासगी शिक्षण संस्था, वकील संघटना, आदीशी अजित पवार यांनी संपर्क साधून अनेकांच्या मत परिवर्तनाचा प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न कितपत यशस्वी झाला हे आज मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
पनवेल विधानसभा मतदारसंघात तीन लाख २० हजारच्या आसपास मतदान झाले आहे, तर उरण मध्ये दोन लाख १५ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.