केडीएमटी सभापतींचे वाहनही ‘धक्का’ स्टार्ट
By admin | Published: November 17, 2016 07:06 AM2016-11-17T07:06:26+5:302016-11-17T07:06:26+5:30
सभापती भाऊसाहेब चौधरी यांना उपक्रमाकडून देण्यात आलेल्या वाहनालाही अखेरची घरघर लागली आहे.
कल्याण : एकीकडे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बस देखभाल-दुरूस्तीअभावी रस्त्यातच बंद पडत असल्याच्या घटना घडत असतानाच केडीएमटीचे सभापती भाऊसाहेब चौधरी यांना उपक्रमाकडून देण्यात आलेल्या वाहनालाही अखेरची घरघर लागली आहे. वाहन नादुरूस्त झाल्याने वारंवार बंद पडत असून धक्का दिल्यानंतरच ते सुरू होत असल्याने सभापतींचे ‘धक्कास्टार्ट वाहन’ पालिका वर्तुळात, राजकीय नेत्यांत, सत्ताधारी शिवसेनेत चर्चेचा विषय ठरले आहे.
सद्यस्थितीत केडीएमटी उपक्रमात गाड्यांचा पुरेसा ताफा असला तरी २० ते २५ बस ब्रेकडाऊन स्थितीत आहेत. त्यामुळे केवळ ७५ गाड्या रस्त्यावर धावत आहेत. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांपेक्षा परिवहनचा उपक्रम विविध समस्यांनी नेहमीच गाजला. देखभाल-दुरूस्तीअभावी नादुरूस्त बसचा प्रश्न गंभीर बनला. बसना आगी लागण्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत. त्यामुळे परिवहनचा प्रवास हा एक प्रकारे जीवघेणा ठरतो आहे. या गाड्यांच्या दुरूस्तीबाबत वारंवार चर्चा झाली. आवाज उठवण्यात आला, पण त्याबाबत कोणतीच हालचाल न झाल्याने परिवहन उपक्रम हा पालिकेसाठी पांढरा हत्ती बनतो आहे.
सुसज्ज आगार आणि कार्यशाळेअभावी नादुरूस्त बसेसचे प्रमाण वाढत असताना आता परिवहन सभापतींना देण्यात आलेले वाहनही नादुरूस्त झाले आहे. हे वाहन अवघे पाच ते सात वर्षे जुने असून बिघाड होण्याचे प्रमाण वाढल्याने ‘धक्कास्टार्ट’चा प्रयोग वारंवार करावा लागतो आहे. बुधवारी सकाळीही संबंधित वाहन नादुरूस्त झाल्याची घटना केडीएमसीच्या मुख्यालयातच घडली. वाहन महापालिकेतून बाहेर काढताना बंद पडले. मुख्यालयाच्या आवारातच वाहन बंद पडल्याने बाहेरून येणारी वाहने पार्क करताना कोंडी झाली. सुरक्षा रक्षक आणि केडीएमटीच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाहन वाटेतून बाजुला करण्यावरून प्रसंगी वादही झाले. अखेर नेहमीप्रमाणे धक्का मारूनच वाहन बाजुला करण्यात आले. या नादुरूस्त वाहनासंदर्भात परिवहन व्यवस्थापक देवीदास टेकाळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
‘‘ गेल्या १५ दिवसांपासून वाहनामध्ये बिघाड होत आहे. सध्या परिवहन उपक्रमाची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे मला पुरविलेल्या सरकारी वाहनाचा जो भत्ता दिला जातो, तो जर मला मिळाला, तर मी माझ्या खाजगी वाहनाचा वापर कामकाजासाठी करू शकेन, असे मी उपक्रमाकडे स्पष्ट केले आहे. परंतु त्यावर ठोस निर्णय झालेला नाही.
- भाऊसाहेब चौधरी
सभापती, केडीएमटी