रोहा : वयात आलेली तरुण मुले आणि मुली घरातून अचानक निघून जाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या घटनांमधून सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. यासाठी पालकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. शाळा-कॉलेजला लवकरच सुट्या लागत आहेत. अशा वेळी वयात आलेल्या मुलामुलींकडे पालकांनी लक्ष ठेवावे, असे आवाहन रोहा पोलिसांनी केले आहे.पालकांनी मुलगा अथवा मुलगी मोबाइलवर एकांतात कोणाशी बोलत आहेत, काय बोलत आहेत तसेच रात्री उशिरापर्यंत फेसबुक, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चॅटिंग करीत नाहीत ना, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्अनेक वेळा मुली मैत्रिणीकडे अथवा नातेवाइकाकडे जात असल्याचे सांगून घराबाहेर पडतात आणि घरी येत नाहीत. यामुळे मुलीला एकटीला न पाठविता नातेवाइकांसमवेत पाठविण्याची खबरदारी घ्या. शाळा, कॉलेज, क्लासमध्ये मुलांच्या येण्या-जाण्याच्या वेळेकडे पालकांनी लक्ष ठेवावे. अनेक वेळा मुलामुलींनी निघून जाण्याच्या अगोदर मोबाइल फोनचा वापर केल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात पालकांना कुटुंब चालविण्यासाठी खूप आटापिटा करावा लागतो. यामुळे पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होत असते. घटना घडून गेल्यानंतर मातापित्यांनी अश्रू ढाळण्यापेक्षा वेळीच योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
वयात आलेल्या पाल्यांकडे लक्ष ठेवा
By admin | Published: April 07, 2016 1:23 AM