दगाफटका टाळण्यासाठी नगरसेवकांवर पाळत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 02:48 AM2018-05-19T02:48:58+5:302018-05-19T02:48:58+5:30
कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नगरसेवक फोडण्याची शक्यता गृहीत धरून, सर्वपक्षीयांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.
वैभव गायकर
पनवेल : कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये नगरसेवक फोडण्याची शक्यता गृहीत धरून, सर्वपक्षीयांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. शेतकरी कामगार पक्षाने त्यांचे नगरसेवक गोव्याला हलविले असून, भाजपाने खोपोलीमधील अॅडलॅब इमॅजिकामध्ये नगरसेवकांना पाठविले आहे.
कर्नाटकामध्ये उद्भवलेल्या परिस्थितीची प्रचिती जणू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत येत आहे. राज्यातील राजकारणात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणारे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी आपल्या मुलाला अनिकेत तटकरेला या निवडणुकीत उतरविले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. निवडणुकीत दगाफटका होऊ नये, म्हणून इतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्रतिनिधींसह पनवेल शेकापचे नगरसेवक मागील दोन दिवसांपासून २९ पैकी जवळ जवळ २५ नगरसेवक गोव्यामध्ये आहेत. तर भाजपाचेही नगरसेवक शुक्र वारी खोपोली येथील अॅडलॅब इमॅजिका येथे रवाना झाले.
भाजपाच्या ५४ नागरसेवकांपैकी ४४ नगरसेवक सध्या इमॅजिका या ठिकाणी आहेत. यापैकी निम्मे नगरसेवक कुटुंबासह या ठिकाणी तळ ठोकून आहेत. २१ तारखेला निवडणूक असल्याने पुढील तीन दिवस भाजपा नगरसेवक बाहेरच असणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे, त्यामुळे अनिकेत तटकरे यांचे पारडे जड मानले जात आहे. माजी दिवंगत आमदार अशोक साबळे यांचे सुपुत्र अॅड. राजीव साबळे हे तटकरेंना अव्हान देत आहेत. सेना-भाजपाची या मतदार संघात अघोषित युती असली, तरी पालघरमधील लोकसभेच्या जागेसाठी सुरू असलेले शीतयुद्धाचे परिणाम या ठिकाणी उमटण्याची शक्यता आहे, त्यामुळे भाजपाची भूमिका निर्णायक असणार आहे.
> पक्षीय बलाबल
या निवडणुकीत एकूण ९४१ मतदार आहेत. ४४१ ही मॅजिक फिगर आहे. काँग्रेस राष्ट्रवादी, शेकाप, मनसेचे एकूण ३५० मतदान आहे. मात्र, राज ठाकरेंनी आमचा कोणालाच पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केल्याने, मनसेची २५ मते कमी होण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी पक्षाची ९६ मते निर्णायक असणार आहेत. यामध्ये फोडाफोडीचे राजकारण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. केंद्रीय मंत्री अनंत गीते, माजी आमदार मधुकर ठाकूर हे तटकरेंचे राजकीय वैरी मानेल जातात, त्यामुळे यांची भूमिकादेखील महत्त्वाची असणार आहे.