‘ती’ पोस्ट हटवण्यास केतकी चितळेचा नकार, सायबर सेलचेही दुर्लक्ष?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 11:48 AM2022-05-24T11:48:13+5:302022-05-24T11:48:59+5:30
राज्याच्या सायबर सेलचेही दुर्लक्ष?
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विरोधात टाकलेली पोस्ट सोशल मीडियावरून हटवण्यास केतकी चितळे हिने पोलिसांना नकार दिला आहे. आपल्या मर्जीनेच आपण ती टाकल्याच्या निर्णयावर ती अद्यापही ठाम आहे. परंतु, या पोस्टमुळे अद्यापही वाद उफाळून येत असतानाही सायबर सेलकडून ती हटवली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.
पवार यांच्यावर टीका करणारी पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळे हिला अटक केली आहे. तिच्या पोस्टमुळे राज्यात राजकीय वाद उफाळून आला आहे. यामुळे ती पोस्ट हटवण्यासंदर्भात पोलिसांनी केतकीला सूचना केल्या आहेत. परंतु, तिने पोस्ट हटवण्यास नकार देऊन आपल्या मर्जीने ती पोस्ट टाकल्याचे सांगितले आहे. यामुळे अद्यापही त्या पोस्टवर वादग्रस्त प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. अशातच सायबर सेलनेदेखील ती पोस्ट हटवलेली नाही. त्यामुळे पोस्टवर अद्यापही नवे वाद निर्माण होतील अशा प्रतिक्रिया येत आहेत. सायबर सेलने अद्यापही पोस्ट न हटवण्यामागचे नेमके कारण काय, असाही प्रश्न उपस्थित केला आहे.
केतकीवर २०२० मध्ये जातिवाचक पोस्ट केल्याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात मागील तीन दिवसांपासून चौकशीसाठी ती नवी मुंबई पोलिसांच्या कोठडीत आहे. यादरम्यान तिच्या सुरक्षेची खबरदारी घेऊन विशेष उपाय करून तिला रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते.
सुनावणी लांबणीवर
ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंबंधी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारी वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेचा जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने तूर्तास राखून ठेवला आहे. त्यावर आता २६ मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ठाण्यातील कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर तिला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली होती. या गुन्ह्यात तिला १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.