खैरवाडी दोन दिवसांपासून अंधारात
By admin | Published: November 10, 2016 03:44 AM2016-11-10T03:44:25+5:302016-11-10T03:44:25+5:30
पनवेल तालुक्यातील खैरवाडी येथील विजेचे पोल कोसळल्यामुळे दोन दिवसांपासून आदिवासी बांधवांना अंधारात राहावे लागत आहे.
पनवेल : पनवेल तालुक्यातील खैरवाडी येथील विजेचे पोल कोसळल्यामुळे दोन दिवसांपासून आदिवासी बांधवांना अंधारात राहावे लागत आहे. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका येथील नागरिकांना बसत आहे. दोन दिवस उलटून गेले तरी देखील महावितरणने येथील विजेचे पोल बसविले नाहीत. त्यामुळे येथील नागरिकांचे हाल होत आहेत.
पनवेलपासून जवळपास १० किलोमीटरवर वसलेल्या खैरवाडी आदिवासी वाडीत ४० ते ४५ घरांची वस्ती आहे. २५० आदिवासी बांधव येथे राहतात. ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास विजेचा पोल खाली पडल्याने येथील वीज गायब झाली व येथील रहिवाशांना अंधारात राहावे लागले. दोन दिवसांपासून येथील वीज गायब झाल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. मात्र महावितरणच्या अधिकाऱ्यांना याकडे लक्ष देता येत नाही. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज नसल्यामुळे अंधारातच रात्र काढावी लागत आहे. त्यामुळे मच्छरांचा त्रास होत असल्याचे आदिवासी बांधवांनी सांगितले. पोल पडल्यामुळे येथील वीज पुरवठा चालूच होता. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी घडली नाही. गंज लागल्यामुळे येथील अनेक पोल पाडण्याच्या स्थितीत आहेत. मात्र महावितरण त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केला.
ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी वीज यंत्रणा जुनाट झाली आहे. काही ठिकाणच्या विजेच्या खांबांना वेलींनी आलिंगन घातले आहे. तर बहुतांश ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळताना दिसत आहेत. विजेच्या तारा तुटणे, खांब पडणे यामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे ग्रामीण भागात महावितरणचा भोंगळ कारभार पहावयास मिळत आहे. बहुतांश भागातील डीपींना झाकणे नाहीत तर काही डीपी दिवस-रात्र उघड्या आहेत. त्यामुळे मोठा अपघात घडू शकतो. विजेच्या खांबांमध्ये असलेले जास्त अंतर यामुळे काही ठिकाणी तारा लोंबकळल्या आहेत. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन जीर्ण विद्युत तारा व विजेचे खांब तत्काळ बदलावेत अशी येथील जनतेची मागणी आहे. याबाबत कनिष्ठ अभियंता जी.एस.सूर्यवंशी यांना विचारले असता शनिवारपर्यंत वीज येईल असे सांगण्यात आले. (वार्ताहर)