खालापूरकरांचे श्रद्धास्थान साबाईमाता

By admin | Published: October 16, 2015 02:20 AM2015-10-16T02:20:46+5:302015-10-16T02:20:46+5:30

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून वळण घेत खालापूर गावात प्रवेश करताना पश्चिमेला वीड, पिंपळाच्या घनदाट फांद्यातून सर्वप्रथम दृष्टीस पडतो

Khalapurkar's reverence Saba Mata | खालापूरकरांचे श्रद्धास्थान साबाईमाता

खालापूरकरांचे श्रद्धास्थान साबाईमाता

Next

खालापूर : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून वळण घेत खालापूर गावात प्रवेश करताना पश्चिमेला वीड, पिंपळाच्या घनदाट फांद्यातून सर्वप्रथम दृष्टीस पडतो तो गावदेवी साबाई मातेच्या मंदिराचा कळस. आई साबाईमाता संपूर्ण गावाचे श्रद्धास्थान आहे. पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य स्वरूपातले मंदिर बांधण्यात आले आहे. देवीच्या स्थानाबद्दल आख्यायिका प्रसिद्ध असून, खालापूरलगत महामार्गाच्या पलीकडे असलेल्या ढापणी गडावर देवीचे मूळ वास्तव्य आहे.
पूर्वी गडावरील देवीच्या पूजेचा मान गुरव कुटुंबाकडे होता. गुरव पत्नी नित्यनेमाने प्रचंड ढापणी गड चढून देवीची पूजाअर्चना करण्यास जात असे. गर्भारपणात गुरव पत्नीला दररोज गड चढून पूजेस जाणे अशक्य झाल्यानंतर तिने देवीला विनवणी करून यापुढे तुझी सेवा करणे अशक्य असल्याचे सांगितले. त्यावेळी आपल्या भक्तासाठी देवी गडाखाली प्रकट झाल्याची कथा सांगितली जाते. याच ठिकाणी सध्या मंदिर आहे. त्या वेळेपासून ढापणी गडावर दरवर्षी हनुमान जयंतीला देवीचा मानाचा ध्वज लावण्याची प्रथा पडली, ती आजतागायत सुरू आहे.
मंदिराची रचना, स्वरूप यामुळे केवळ लोकवर्गणीच्या माध्यमातून मंदिर पूर्ण होणे अशक्यप्राय झाल्यानंतर गावातील बेंद्रे कुटुंब तसेच सध्या जबलपूरचे (मध्य प्रदेश) रहिवासी असलेले साबाईमाता कुलदैवत मानणारे साने कुटुंबाने आर्थिक डोलारा सांभाळत मंदिर पूर्णत्वास नेले. गावदेवी मंदिराचे काम मार्गी लागावे यासाठी ग्रामस्थांनी कष्ट घेतले. गुरव कुटुंबानंतर हभप मारुती पाटील यांनी अखंड ४० वर्षे देवीची सेवा केली. त्यांच्या निधनानंतर पूजेचा मान राजेश देसाई यांना मिळाला. नवरात्रोत्सवात मंदिरात घटस्थापना, पूजा, आरती, भजन व गोंधळाचा कार्यक्रम निरंतर सुरू असतो.
दसऱ्याच्या रात्री संपूर्ण गावात साबाई मातेची पालखी फिरते. (वार्ताहर)

Web Title: Khalapurkar's reverence Saba Mata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.