नवी मुंबई : आयटी पार्क आणि शैक्षणिक संस्थांच्या विस्तीर्ण जाळ्यामुळे नवी मुंबई शहर अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्या तस्करांची राजधानी बनू पाहत आहे. यात मोठी संख्या नायजेरियन तस्करांची असल्याने नवी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी राबविलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशनद्वारे पकडलेल्या ७५ नायजेरियन घुसखोरांच्या संख्येवरून सिद्ध झाले आहे. आतापर्यंत पोलिसांसह एनसीबीने ज्या ज्या कारवाया केल्या, त्यात नायजेरियन तस्करांचा सहभाग वारंवार उघडकीस आला आहे.
घुसखोरांकडून नवी मुंबईची निवड का? नवी मुंबई हे महामुंबई परिसरातील एक शांत आणि सुनियोजित शहर आहे. या शहरांत नवी मुंबईत शाळा, महाविद्यालये, मेडिकल कॉलेज, अभियांत्रिकी, नर्सिंग, महाविद्यालये यांचे मोठे जाळे आहे. याशिवाय येथील टीटीसी औद्योगिक वसाहतीत आयटी कंपन्यांची संख्या मोठी आहे. अलीकडे कॉल सेंटरची संख्या वाढू लागली आहे. यामुळे या शैक्षणिक संस्थांत शिकणारे, हॉस्टेलमध्ये राहणारे आणि आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याच वर्गाला हेरून अमली पदार्थांची तस्करी करणारे पेडलर आपले ग्राहक बनवतात. यामुळे त्यांची संख्या नवी मुंबईत वाढत आहे.
गावठाणांसह विस्तारित शहरांत स्वस्तात घरे
नवी मुंबईतील गावठाणे आणि विस्तारित शहरांत घरांचे भाडे तसे स्वस्त आहे. या भागात पोलिसांची गस्तही कमी असते. वर्दळही तशी कमी असते. हे तस्कर अशी गावठाणे, विस्तारित भागात भाड्याने घरे घेऊन राहतात. विदेशी नागरिक जास्त भाडे देतात, म्हणून घरमालक त्यांची माहिती पोलिसांना न देता, त्यांना भाडेकरू म्हणून ठेवून घेत असल्याचे तपासात अनेकदा उघड झाले आहे. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी पकडलेल्या कारवायांमध्येही नायजेरियन नागरिक असलेल्या तस्करांचा समावेश आढळला आहे. विशेष म्हणजे यात महिलांची संख्याही मोठी आहे.
शुक्रवारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कारवाईनंतर नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रात केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. ३१ डिसेंबर २०२२ च्या मध्यरात्री सुरुवातीलाच नवी मुंबई पोलिसांनी खारघर येथील कारवाईत १० पुरुष आणि सहा महिलांना अटक करून एक कोटीहून अधिक किमतीचे चरस, गांजा, मेथ्थाक्युलॉनचा साठा जप्त केला होता. १५ रोजी पोलिसांनी एका नायजेरियनकडून अमली पदार्थांचा साठा जप्त केला होता. १ मे रोजी तळोजा-खारघरमधूनच ११ लाख ६० हजारांचा साठा जप्त करून एका नायजेरियनला ताब्यात घेतले होते. तो तुरुंगातून सुटून आलेला होता.