कळंबोली : खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोर बांधण्यात येणाऱ्या गृह प्रकल्पाच्या जागेची स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी पाहणी केली. त्यांनी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिकांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सिडकोच्या भूमिकेबद्दल बारणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सिडकोचे धोरण रहिवाशांवर अन्यायकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
खांदेश्वर रेल्वे स्थानकासमोरील सेक्टर २८ येथे मोकळ्या भूखंडावर सिडको पंतप्रधान आवास योजना राबवत आहे. येथे अल्प उत्पादन गटातील नागरिकांकरिता घरे बांधली जाणार आहेत. परंतु सध्या या जागेवर बस टर्मिनल, रेल्वे प्रवाशांसाठी वाहनतळाची सोय आहे. सकाळ-संध्याकाळी याठिकाणी नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात. स्थानकासमोरील जागेत गृहप्रकल्प झाल्यास स्थानकाचा श्वास कोंडेल. शिवाय भविष्यात पार्कि ंग, वाहतूक कोंडी, पाणीप्रश्न आदी समस्या उद्भवेल. हा लढा न्याय हक्कासाठी असल्याचे कामोठे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. याविरोधात नागरी हक्क समिती स्थापन करण्यात आले आहेत. सिटीजन युनिटी फोरम, एकता सामाजिक सेवा संस्था, सेक्टर ३६ मधील रहिवासी यासारख्या अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या आंदोलनामध्ये पुढाकार घेतला आहे. रविवारी खांदेश्वर रेल्वे स्थानक परिसरातील गृहप्रकल्पाला विरोध म्हणून आंदोलन करण्यात आले. याविरोधात सेनेचे पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांनी आक्रमक भूमिका घेतली. शनिवारी त्यांनी व नागरी हक्क समीतीने राज्याचे गृहमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत सिडकोच्या अन्यायकारक प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी केली. तसेच त्यांनी याविषयी स्थानिक खासदार श्रीरंग बारणे यांनाही साकडे घातले. त्याप्रमाणे सोमवारी बारणे यांनी खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात येऊन पाहणी केली. याठिकाणी लावण्यात आलेल्या पत्र्याचे कुंपण पाहून आश्चर्य व्यक्त केले.
सर्वसामान्य प्रवाशांची वाट अडवून सिडको काय साध्य करीत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. याबाबत सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन जाब विचारला असल्याचेही खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा प्रकल्प आणि त्याला होणारा विरोध याविषयी माहिती देणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.