नवी मुंबई : जेएनपीटी टर्मिनल ४ च्या कामासाठी साडेचार हेक्टर जमिनीवर भराव टाकून खारफुटी नष्ट करण्यात येत आहे. या विषयी सामाजिक संस्थांनी शासनाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
नवी मुंबई, उरणला विस्तीर्ण खाडीकिनारा लाभला आहे. किनाऱ्याला लागून खारफुटीचे जंगल आहे. ही वनराई शहरासाठी प्राणवायूप्रमाणे काम करत आहे. भरतीचे पाणी शहरात शिरू नये व किनाºयांची झिज रोखण्यासाठी महत्त्वाची कामगिरी करत असते; परंतु विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात खारफुटी नष्ट केली जाते. सद्यस्थितीमध्ये जेएनपीटी टर्मिनल-४ च्या सेझचे काम सुरू आहे.
तब्बल साडेचार हेक्टर जमिनीवरील खारफुटीचे हजारो वृक्ष नष्ट केले जात आहेत. याचा गंभीर परिणाम पर्यावरणावर होऊ लागला आहे. हा ºहास रोखण्यासाठी श्री एकवीरा आई प्रतिष्ठान व द नेचर कनेक्टर डॉट कॉमचे पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते बी. एन. कुमार यांनी दोन महिन्यांपूर्वीच संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या; परंतु त्याची दखल घेतली नसल्यामुळे शासनाकडे धाव घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नौकानयनमंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही तक्रार केली होती.
तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. याविषयी तक्रारदारांना पत्र पाठवून माहिती दिली आहे. या प्रकरणाची राज्याचा नगर विकास विभाग व बंद विभाग कार्यवाही करेल, असे स्पष्ट केले आहे. हे पत्र यूडी २ सचिव मनीषा पाटणकर आणि वाहतूक विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंग यांनाही याविषयी पत्र दिले. पर्यावरणविषयी जागृती करणारे बी. एन. कुमार व श्री एकवीरा आई प्रतिष्ठान यांनी समाधान व्यक्त केले आहे.