नवी मुंबई: शहरात विकासाच्या नावाखाली ठिकठिकाणी खारफुटींची सर्रास कत्तल सुरू आहे. डेब्रिज टाकून खारफुटीची जंगले नष्ट केली जात आहेत. यावर उपाय म्हणून आवश्यक तेथील कांदळवनांवर सीसीटीव्ही बसविण्याचे निर्देश कोकण आयुक्तांनी महापालिकेला दिले होते. परंतु एक वर्ष उलटले तरी महापालिकेच्या संबंधित विभागाकडून यासंदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून आले आहे. खाडी किनाऱ्यावर वसलेल्या नवी मुंबई शहरात मोठ्याप्रमाणात खारफुटी आहे. परंतु विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी खारफुटींची सर्रास कत्तल केली जात आहे, तर काही ठिकाणी बेकायदा डेब्रिज टाकून खारफुटी नष्ट केली जात आहे. विशेष म्हणजे खारफुटींचे संरक्षण करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यासाठी ठोस उपाययोजना आखण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कांदळवन संरक्षण समितीची स्थापना करण्यात आली आहे. गेल्या वर्षी या समितीच्या झालेल्या बैठकीत तत्कालीन कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांनी खारफुटीचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या परिसरातील कांदळवनांवर सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना महापालिका व सिडको प्रशासनाला दिल्या होत्या. महानगरपालिका व सिडको यांच्याकडील घनकचरा संबंधीच्या नागरिकांच्या तक्रारी समितीच्या बैठकीत सादर कराव्यात. त्या तक्रारीवर करण्यात आलेल्या अंमलबजावणीबाबतचा अहवाल या बैठकीत ठेवण्यात यावा. ज्या ठिकाणी डेब्रिज टाकून कांदळवन नष्ट केले आहे, तेथील डेब्रिज काढून पुन्हा कांदळवनाची लागवड करण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. तसेच महापालिका क्षेत्रात दोन मोठे कांदळवन आहेत. या दोन ठिकाणी महापालिकेने सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. परंतु त्यानंतरही खारफुटीची नासाडी सुरूच असल्याने त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे महापालिकेला सूचित करण्यात आले होते. मात्र वर्ष उलटून ही पालिकेकडून कार्यवाही झाली नाही.
खारफुटीची होतेय सर्रास कत्तल
By admin | Published: September 23, 2016 3:27 AM