खारघर-बेलापूर सागरी मार्ग रखडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 05:04 AM2019-11-10T05:04:09+5:302019-11-10T05:04:14+5:30
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या माध्यमातून खारघर ते बेलापूर दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या सागरी मार्गाचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या माध्यमातून खारघर ते बेलापूर दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या सागरी मार्गाचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कामासाठी सिडकोने जे. कुमार इन्फ्रा या कंपनीची नियुक्ती केली आहे; परंतु या कंपनीबाबत न्यायालयीन वाद निर्माण झाल्याने तूर्तास या प्रकल्पाच्या कामाला खीळ बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम प्रगतिपथावर आहे. २०२० मध्ये या विमानतळावरून विमानाचे टॅकआॅफ होईल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे. त्या अनुषंगाने विमानतळाला पूरक अशा दळणवळणाच्या सुविधांवर सिडकोने भर दिला आहे. रस्ते वाहतुकीसह मेट्रो व सागरी मार्गाच्या निर्मितीवर विशेष भर दिला जात आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारा सागरी मार्ग दोन टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) शिवडी ते नवी मुंबई विमानतळ हा या प्रकल्पाचा पहिला टप्पा आहे. तर खारघर, आम्रमार्ग आणि नेरुळ येथील जेट्टी असा ९.५ कि.मी. लांबीचा या मार्गाचा दुसरा टप्पा असणार आहे. २०२१ पर्यंत दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात येणार असून, त्यासाठी २७० कोटी रुपये खर्च निर्धारित करण्यात आला आहे. या कामाचा ठेका जे. कुमार इन्फ्रा या कंपनीला देण्यात आला आहे; परंतु रस्त्याच्या कामातील अनियमितता आणि सुमार दर्जामुळे मुंबई महापालिकेने २०१६ मध्ये या कंपनीला सात वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले होते. हाच धागा पकडून ललित अग्रवाल यांनी सिडकोच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर जे. कुमार इन्फ्रा या कंपनीला तूर्तास सागरी मार्गाच्या कामाची वर्कआॅर्डर न देण्याचे निर्देश न्यायालयाने सिडकोला दिले आहेत. या प्रकरणी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे सिडकोचे मुख्य अभियंता एस. के. चौटालिया यांनी स्पष्ट केले आहे.
>काम नियोजित वेळेतच पूर्ण
या प्रकरणामुळे निर्माण झालेला न्यायालयीन तिढा सुटण्यास किती काळ लागेल याचा नेम नसल्याने या मार्गाचे काम रखडण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे; परंतु सिडकोच्या संबंधित विभागाने ही शक्यता फेटाळून लावली असून प्रस्तावित मार्गाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त
केला आहे.