सिडकोच्या विरोधात खारघर बंद, सर्वपक्षीय नेत्यांसह रहिवासी एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 04:35 AM2017-11-06T04:35:21+5:302017-11-06T04:35:24+5:30
सिडकोने अनधिकृत धार्मिक स्थळांवर तोडक कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. शुक्र वारी सिडकोने कळंबोली शहरातील १३ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केल्यानंतर
पनवेल : सिडकोने अनधिकृत धार्मिक स्थळांवर तोडक कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. शुक्र वारी सिडकोने कळंबोली शहरातील १३ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केल्यानंतर, सोमवारी मोर्चा खारघर शहराकडे वळवणार असल्याचे कळल्यानंतर याविरोधात खारघरमधील नागरिक व सर्वपक्षीय नेते एकवटले आहेत. या कारवाईच्या निषेधार्थ रविवारी संपूर्ण खारघर बंदची हाक दिली होती. शहरातील सर्व रिक्षा, टेम्पो संघटना, व्यापारी संघटना या बंदमध्ये सहभागी झाल्या होत्या.
खारघर शहरातील १५ धार्मिक स्थळांना तोडण्यासंदर्भात सिडकोने संबंधितांना नोटिसा बजावलेल्या आहेत. या कारवाईविरोधात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शनिवारी एकत्रित बैठक घेऊन या कारवाई विरोधात आवाज उठविण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी या कारवाईच्या निषेधार्थ शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सेक्टर ७, २१, १९, १२, या वर्दळीच्या ठिकाणी बंद यशस्वी झाला. तसेच शहरातील रिक्षाचालक, टेम्पोचालक संघटनादेखील या बंदमध्ये सहभागी झाल्याने शहरात प्रवाशांचे हाल झालेले पाहावयास मिळाले.
रविवारी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन शहरात निषेध मोर्चा काढला होता. या मोर्चात शेकडोंच्या संख्येने शहरातील नागरिक, विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. सत्ताधारी भाजपा पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवक, पदाधिकाºयांनी या बंदमध्ये सक्रि य सहभाग घेतला आहे. सोमवारी सिडकोच्या कारवाईच्या निषेधार्थ ‘जेल भरो’ आंदोलनाचा इशारा भाजपाचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष विजय पाटील, शिवसेनेचे शहरप्रमुख गुरु नाथ पाटील यांनी दिला आहे.
शहरात सिडकोने मंदिरासाठी राखीव भूखंड ठेवले नसल्याने खारघरमधील रहिवाशांनी आपल्या श्रद्धेपोटी धार्मिक स्थळे उभारली आहेत. अनेक वर्षांपासून ही स्थळे शहरातील नागरिकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखली जात असताना सिडकोने ती अनधिकृत ठरवली असल्याचा आरोप शेकाप नगरसेवक गुरु नाथ गायकर यांनी केला आहे. याविरोधात खारघरवासीय सिडकोचा निषेध करीत असल्याचे गायकर यांनी सांगितले.
शहरात रविवारी कायदा व्यवस्था बिघडू नये, म्हणून सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी सर्वपक्षीय नेत्यांची भेट घेऊन त्यांना कायदा हातात न घेण्याची विनंती केली. या वेळी खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप काळे, नगरसेवक अभिमन्यू पाटील, नीलेश बाविस्कर, शत्रुघ्न काकडे, प्रवीण पाटील, खारघर भाजपा अध्यक्ष ब्रिजेश पटेल, संतोष तांबोळी आदींसह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते.