खारघरमध्ये नगरसेविकेने रस्त्याचे काम थांबविले; पाणीसमस्या मार्गी न लागल्याने उचलले पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 01:48 AM2020-12-04T01:48:57+5:302020-12-04T01:49:28+5:30
गरड यांनी सेक्टर ३, ४, ५, ६, ७ आणि १२ यामध्ये सर्वे करून, तो सिडकोला सादर केला होता. सेक्टर १२ मधील अंतर्गत रस्त्याचे काम दीड वर्षापूर्वी चालू झाले होते.
पनवेल : खारघर सेक्टर १२मध्ये पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. नागरिकांना दिवसभर पाणी मिळत नाही. यासंदर्भात स्थानिक नगरसेविका लीना गरड यांनी येथे सुरू असलेले रस्त्याचे काम थांबवत या रस्त्याखाली जीर्ण झालेली पाणीपुरवठ्याची जलवाहिनी नव्याने टाकण्याचा आग्रह सिडको अधिकाऱ्यांकडे धरला. जोपर्यंत पाण्याची समस्या मार्गी लावली जात नाही तोपर्यंत डांबरीकरण नको, अशी भूमिका गरड यांनी घेतली आहे.
गरड यांनी सेक्टर ३, ४, ५, ६, ७ आणि १२ यामध्ये सर्वे करून, तो सिडकोला सादर केला होता. सेक्टर १२ मधील अंतर्गत रस्त्याचे काम दीड वर्षापूर्वी चालू झाले होते. या परिसरातील एफ विभागात पाण्याची समस्या जलवाहिनी जीर्ण झाल्याने ही गंभीर आहे. बुधवारी येथे सुरू असलेले काम गरड यांनी थांबविले. गुरुवारी यासंदर्भात सिडकोचे पाणीपुरवठा अधिकारी गजानन दलाल यांनी ३१ डिसेंबरपर्यंत नवीन जलवाहिनी टाकण्याचे आश्वासन गरड यांना दिले.
पाच वर्षे समस्या
सेक्टर १२ मधील एफ लाइनमध्ये गेल्या पाच वर्षांपासून पाण्याची समस्या सुरू आहे. खारघरला १० एमएलडी पाण्याचा तुटवडा आहे. त्यातच खारघर सेक्टर १२ मध्ये पाण्याची समस्या गंभीर आहे. एफ लाइनची पाण्याची पाइपलाइन खराब झाली असल्याने रहिवाशांना मुबलक पाणी मिळत नाही.