खारघरमध्ये ट्रिपल तलाकअंतर्गत गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 01:26 AM2019-11-05T01:26:18+5:302019-11-05T01:26:21+5:30
केंद्र सरकारने नव्याने ट्रिपल तलाकअंतर्गत कायदा पारित केल्याने महिलेच्या
पनवेल : खारघर पोलीस ठाण्यात वीस वर्षीय पत्नीने पतीविरोधात ट्रीपल तलाक अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दुसऱ्या महिलेशी लग्न करून पतीने तलाक तलाक तलाक बोलून आपल्याशी काडीमोड केल्याची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
केंद्र सरकारने नव्याने ट्रिपल तलाकअंतर्गत कायदा पारित केल्याने महिलेच्या तक्रारीवरून खारघर पोलिसांनी ट्रिपल तलाकसह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार महिला खारघर सेक्टर २० मध्ये वास्तव्यास असून विज्ञान शाखेच्या तृतीय वर्षात शिकत आहे. जून २०१८ मध्ये तिचे लग्न झाले. मात्र महिनाभरातच पती सोहेल शेख (२८) व त्याच्या कुटुंबीयांनी महिलेचे त्रास देण्यास सुरुवात केली. एकदा घरात तिला एक अल्बम सापडला ज्यात पती सोहेलच्या लग्नाचे जुने फोटो होते. याबाबत तिने विचारणा केली असता पतीने वाद घातला. सप्टेंबर महिन्यात झालेल्या भांडणात पती सोहेलने तलाक तलाक तलाक असा तीन वेळा उल्लेख करीत तिला माहेरी सोडले. त्यानंतरही पती व सासरच्या मंडळींकडून तिला वारंवार अपमानीत करण्यात आले. अखेर विवाहितेने खारघर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सोहेलविरोधात फसवणूक, ट्रिपल तलाक अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.