पनवेल : पावसाळ्यात खारघर टेकडीवर होणाऱ्या दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच जीवितहानी होण्याची शक्यता असते. या दुर्घटना टाळण्यासाठी सिडको प्रशासनाने १५ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत खारघर टेकडीवर पर्यटकांसाठी प्रवेश बंद केला आहे. मात्र टेकडीवरील चाफेवाडी, फणसवाडी येथील गावकऱ्यांना यामधून सूट असणार आहे. सिडकोच्या खारघर येथील कार्यालयातून यासंदर्भात खारघर पोलिसांना पत्र देण्यात आले आहे.नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात खारघर टेकडी हे ठिकाण निसर्गाच्या सान्निध्यात आहे. विशेष म्हणजे या ठिकाणाहून संपूर्ण नवी मुंबई शहराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते. सिडकोने याठिकाणी जाण्यासाठी डांबरी रस्ता, पथदिवे बसविले आहेत. शहरामधील अनेक नागरिक या ठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकला येतात. मात्र पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता असल्याने पर्यटकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच सिडकोने या ठिकाणी १५ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोने याठिकाणी सहा सुरक्षारक्षकही नेमले आहेत. मात्र, काही अतिउत्साही पर्यटक सुरक्षारक्षकांना न जुमानता टेकडीवर जातात.अशा पर्यटकांना रोखण्यासाठी सिडकोच्या वतीने खारघर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून बंदोबस्ताची मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार खारघर पोलीस ठाण्याच्या वतीने या ठिकाणी पोलीस नियुक्त करणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी दिली.शनिवारी, रविवारी खारघर टेकडीवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळते. पर्यटकांच्या सुरक्षेसाठीच दरवर्षीप्रमाणे यंदाही टेकडीवरील प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यटकांनी त्याचे पालन करावे.- संजय पुदाळे, सिडको अधिकारी, खारघर विभाग
खारघर हिल पर्यटकांसाठी बंद; सिडकोचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:31 PM