पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोविड रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली असून विद्यमान रुग्णांचा आकडा एक हजाराच्या वर गेला असून ही विद्यमान रुग्णसंख्या १११० वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे पालिका क्षेत्रात खारघर शहरात सर्वाधिक रुग्ण असून त्यापाठोपाठ कळंबोली व नवीन पनवेल शहराचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. कामोठे, कळंबोली, खारघर, नवीन पनवेल परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने नोकरदार वर्ग आहे. त्या ठिकाणची लोकसंख्या मोठी आहे.अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे अनेकांना कामाच्या ठिकाणी लागण झाल्याचे समोर येत आहे. मुंबई पोलीस, बेस्ट कर्मचारी, मुंबई महापालिका क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी, एसटी महामंडळ कर्मचारी हे पनवेल परिसरातून ये-जा करतात. या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांच्या संपर्कात कोरोनाबाधित आल्यामुळे कोरोना योद्धेच कोरोनाच्या जाळ्यात अडकत आहेत. लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा सर्व आस्थापना सुरू झाल्याने कोविड रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. यात खारघर परिसरातील सर्वात जास्त म्हणजे आतापर्यंत ३५६ जणांना लागण झाली आहे. नवीन पनवेल येथे १९२ कोरोनाचे रुग्ण आहेत. या खालोखाल कळंबोलीमध्ये १९९ विद्यमान रुग्ण आहेत.पहिल्या टप्प्यात कोरोनाबाबत घेतली जाणारी खबरदारी दुसऱ्या टप्प्यात काही प्रमाणात ढिली पडल्याचे दिसून येत आहे. सील करण्यात आलेल्या सोसायट्यांवर पालिकेचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. तसेच नागिरकांचे मास्क न घालता फिरणे हेही कोरोना वाढीला आमंत्रण देते आहे.
कोरोनाबाधित तसेच क्वारंटाइन केलेले नागरिक नियमांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळेच मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तेथील लोकसंख्या मोठी आहे. नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. - डॉ. आनंद गोसावी, वैद्यकीय अधिकारी, पनवेल महानगरपालिका