सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट : खारघर नोड तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 02:08 AM2019-09-07T02:08:46+5:302019-09-07T02:09:03+5:30

सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट : नियोजन फसले; २०० सोसायट्यांच्या तक्रारी

Kharghar node thirsty, cidco dream project of navi mumbai | सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट : खारघर नोड तहानलेलाच

सिडकोचा ड्रीम प्रोजेक्ट : खारघर नोड तहानलेलाच

Next

नवी मुंबई : ड्रीम प्रोजेक्ट म्हणून सिडकोने खारघर नोडची उभारणी केली. पारसिक हिलच्या कुशीत वसलेल्या खारघरमध्ये प्रशस्त रस्ते, मोकळी मैदाने, उद्यानांचे जाळे, आंतरराष्ट्रीय गोल्फ कोर्स आदी सुविधांची पूर्तता करण्यात आली आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याचे नियोजन मात्र फसल्याचे दिसून आले आहे. सिडकोने अलीकडेच केलेल्या आवाहनानुसार खारघरमधील सुमारे २०० गृहनिर्माण सोसायट्यांनी अनियमित पाणीपुरवठ्याबाबत तक्रार नोंदविली आहे. यावरून सिडकोच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेला खारघर नोड आजही काही प्रमाणात तहानलेलाच असल्याचे दिसून आले आहे.

मागील काही वर्षांत खारघरची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. शिवाय, या विभागात सिडकोचे विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प आहेत. त्यामुळे राहण्याच्या दृष्टीने सर्वाधिक पसंती खारघरला दिली जात आहे. याचाच परिणाम येथील लोकसंख्येचा आलेख वाढताना दिसत आहे. खारघरमध्ये सिडकोने उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत; परंतु वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात येथे पाण्याची समस्या डोके वर काढताना दिसत आहे. याचा परिणाम म्हणून मागील काही वर्षांपासून अनियमित पाणीपुरवठ्याबाबत येथील रहिवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत. खारघरसह कळंबोली, कामोठे, द्रोणागिरी, पनवेल, तळोजा, करंजाडे, उलवे आदी विभागातील रहिवाशांच्या पाण्याविषयी तक्रारी वाढत आहेत. यासंदर्भात निर्णायक तोडगा काढण्यासाठी सिडकोच्या संबंधित विभागाने २२ ते २८ आॅगस्ट या कालावधीत पाण्याविषयीच्या तक्रारी सादर करण्याचे आवाहन रहिवाशांना केले होते. तक्रारी सादर करण्यासाठी विभागनिहाय वेळ देण्यात आली होती. या कालावधीत पनवेलसह विविध नोडमधून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठ्याविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात सर्वाधिक तक्रारी खारघर नोडमधून असल्याचे समजते. सिडकोच्या कार्यक्षेत्रात जवळपास २५ हजार गृहनिर्माण सोसायट्या आहेत. यातील अनेक सोसायट्या बहुमजली आहेत.
बहुतांशी सोसायट्यांतून अनियमित पाणीपुरवठ्यासंदर्भातील तक्रारी आहेत. असे असले तरी दिलेल्या कालावधीत प्राप्त झालेल्या तक्रारींचे प्रमाण केवळ एक टक्का असल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे.

पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील खारघरसह सिडकोच्या सर्व नोडमध्ये यावर्षी पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागल्या आहेत. पनवेल शहर आणि परिसरातील गावांनाही या वर्षी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे अनेक वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ महापालिकेवर आली. सुदैवाने या मौसमात समाधानकारक पाऊस पडला. त्यामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न काही प्रमाणात निकाली निघाला. मात्र, पाणीपुरवठा करणाऱ्या जीर्ण झालेल्या यंत्रणा, कमी व्यासाच्या जलवाहिनी आदीमुळे आजही शहराच्या अनेक भागात कमी दाबाने आणि अनियमित पाणीपुरवठा होत आहे. खारघरमध्येही हीच परिस्थिती असल्याने तेथील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांतील रहिवाशांच्या पाणीपुरवठ्याविषयी तक्रारी आहेत. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याच्या जुन्या यंत्रणा अद्ययावत करण्याची गरज असल्याचे रहिवाशांचे मत आहे.
 

Web Title: Kharghar node thirsty, cidco dream project of navi mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.