गजानन मारणे प्रकरणात खारघर पोलिसांचा निष्काळजीपणा?; गर्दी जमूनही लागला नाही थांग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2021 01:23 AM2021-02-25T01:23:52+5:302021-02-25T06:42:27+5:30
घटनेच्या तीन दिवसानंतर दाखल केला गुन्हा
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : तळोजा कारागृहाबाहेर बेकायदा जमाव जमवून गुंड गजानन मारणेचे जंगी स्वागत केल्याप्रकरणी तीन दिवसांनी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोशल मीडियावरील व्हिडीओ व बातम्यांच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून खारघर पोलिसांच्या गोपनीय विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पुण्याचा कुख्यात गुंड गजानन याची हत्येच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर १५ फेब्रुवारीला तळोजा कारागृहातून त्याला सोडण्यात आले. या वेळी मारणेच्या स्वागतासाठी तळोजा कारागृहाबाहेर मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. त्या ठिकाणी घोषणाबाजी करत मारणेच्या समर्थकांनी त्याचे कारागृहाच्या प्रवेशद्वारावर जंगी स्वागत केले होते. तर कारागृहातून बाहेर येताना गाडीबाहेर अंग काढून मारणे याने समर्थकांचे आभार मानत फिल्मी स्टाईल इंट्री मारली होती.
यानंतर तळोजा ते पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली. त्यात ५०० हून अधिक वाहनांचा समावेश असल्याने उर्से टोलनाका येथे वाहतूककोंडी झाल्याने कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मारणे व त्याच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान, मारणेच्या जंगी स्वागताचे व मिरवणुकीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते. त्याद्वारे तीन दिवसांनी खारघर पोलीस ठाण्यात मारणे व त्याच्या साथीदारांवर जमाव जमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. यावरून खारघर पोलिसांच्या गोपनीय विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
...तर मिरवणुकीला अटकाव लागला असता!
मारणे हा कारागृहातून सुटणार असल्याची माहिती कारागृहाच्या अधिकाऱ्यांनी दिली नव्हती, असे खारघर पोलिसांचे म्हणणे आहे. तशी नोंददेखील एफआयआरमध्ये करण्यात आली आहे. त्यावरून कारागृहाबाहेर जमाव जमूनदेखील तीन दिवसांपर्यंत पोलिसांना त्याची खबर नव्हती हे स्पष्ट होत आहे. तळोजा कारागृहाबाहेर मारणेचे समर्थक जमत असतानाच, कारागृह प्रशासन व खारघर पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर मारणेच्या जंगी मिरवणुकीला अटकाव लागला असता असे कायदे तज्ज्ञांचे मत आहे.