खारघर रेल्वे स्थानक सापडले समस्यांच्या गर्तेत; प्रवाशांची होतेय गैरसोय, सातपैकी एकच तिकीट खिडकी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 04:50 AM2020-01-30T04:50:55+5:302020-01-30T04:51:13+5:30
- वैभव गायकर पनवेल : खारघर रेल्वे स्थानक समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. एकीकडे दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असताना प्रवाशांच्या ...
- वैभव गायकर
पनवेल : खारघर रेल्वे स्थानक समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. एकीकडे दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत असताना प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेल्या तिकीट खिडक्या मात्र दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. सध्याच्या घडीला या ठिकाणी सातपैकी केवळ एकच तिकीट खिडकी सुरू असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
विशेष म्हणजे, अपंगासाठी राखीव असलेली तिकीट खिडकीही बंद असल्याने अपंग प्रवाशांनाही सामान्य प्रवाशांच्या रांगेत उभे राहून आपले तिकीट घ्यावे लागत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहाराला चालना देण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. नागरिकांना कॅशलेस सेवेसाठी उपकृत करण्यात आले. मात्र, केंद्र सरकारच्या अखत्यारितच येणाऱ्या रेल्वे मंत्रालयाच्या या विभागात कार्ड पेमेंट बंद असल्याचा बोर्ड खारघर रेल्वे स्थानकांच्या तिकीट खिडकीवर लावण्यात आला आहे.
खारघर रेल्वे स्थानकावरून दररोज ६० हजार पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत असतात, अशा वेळी सातपैकी केवळ एकच तिकीट खिडकी सुरू ठेवणे हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न प्रवासी संघटना विचारत आहेत. सध्याच्या घडीला सर्वत्र स्वच्छ सर्वेक्षण २०२० सुरू असताना खारघर रेल्वे स्थानकातील दुर्गंधी, येथील शौचालयात अस्वच्छता पाहता रेल्वे प्रशासनालाच स्वच्छ सर्वेक्षणाचे महत्त्व नाही, असे चित्र या ठिकाणी पाहवयास मिळत आहे. रेल्वे स्थानकाच्या आतमध्ये भिकाऱ्यांनी बस्तान मांडले आहे. तरीदेखील रेल्वे प्रशासन सुस्त बसले आहे.
खारघर रेल्वे स्टेशनची उभारणी सिडकोच्या माध्यमातून करण्यात आली आहे. मात्र, अल्पावधीतच संपूर्ण स्थानकाची दुरवस्था झाली आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
खारघर रेल्वे स्थानकातील समस्यांसंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. मागील वर्षभरापासून शहरातील एकाही लोकप्रतिनिधीने या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनातील अधिकाºयांची भेट घेतलेली नाही.
प्रवासी संघटना घेणार रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांची भेट
खारघर रेल्वे स्थानकातील विविध समस्यांच्या तक्रारी आमच्याकडे प्रवाशांनी केलेल्या आहेत. यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचे पनवेल प्रवासी संघाचे
डॉक्टर भक्तिकुमार दवे यांनी सांगितले.
सरकता जिनादेखील बंदच
खारघर रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडल्यावर स्कायआॅकवर चढण्यासाठी सिडकोने उभारलेला सरकत जिनाही अनेक दिवसांपासून बंद आहे, यामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.