पनवेल : राष्ट्रीय एकात्मतेसाठी बेटी बचाव बेटी पढाव, स्टॉप ग्लोबल वॉर्मिंग, कॅप्स विथ हेल्मेट, सेव्ह वॉटर, रक्तदान या ज्वलंत सामाजिक विषयांच्या प्रचार व प्रसारासाठी खारघर शहरातील लिटलवर्ल्ड मॉलमध्ये सलग गायनाचा उपक्रम राबविण्यात आला. रविवारी या विक्रमाची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली. याआधी सलग गायनाचा ७९२ तास २ मिनिटांचा विक्रम चीनने नोंदवला होता. तो मोडीत काढून भारताने सलग ८९५ तासांचा नवा विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवला. यावेळी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डचे अधिकारी उपस्थित होते.
विराग मधुमालती ग्रुपच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन १५ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान खारघर शहरात करण्यात आले होते. उपक्रमात देशभरातील कानाकोपऱ्यातील गायक, संगीतप्रेमी सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्टÑासह दिल्ली, केरळ, चेन्नई, आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, ओरिसा, गुजरात, राजस्थान आदी प्रांतातील ११००पेक्षा जास्त गायक सहभागी झाले होते.मराठी, हिंदीसह विविध प्रादेशिक भाषांतील गाणी यावेळी सादर करण्यात आली. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आजतागायत सलग ७९२ तास गायनाच्या विक्रमाची नोंद चीन देशाच्या नावावर होती. या उपक्रमात सहभागी झालेल्या गायकांवर नजर ठेवण्यासाठी ४ कॅमेरे, तसेच प्रत्येक सेकंदाची नोंद करण्यासाठी निरीक्षक या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे अद्यापपर्यंत १२,५००पेक्षा जास्त विविध प्रकारची गीते या ठिकाणी गायली गेली आहेत. रविवारी सलग ८९५ तास गायनाचा नवीन विक्रम भारताच्या नावावर झाला. गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डची प्रशासकीय अधिकारी रिशी नाथ यांच्या हस्ते आयोजकांना सन्मानित करण्यात आले.