पनवेल : खारघरमधील रिक्षा चालकांनी सलग सातव्या दिवशी बंद ठेवत प्रवाशांना वेठीस धरले आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाने यासंदर्भात बघ्याची भूमिका घेतल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, रिक्षा बंदचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह नोकरदार, महिला व विद्यार्थ्यांना बसला आहे.गेल्या मंगळवारी हद्दीच्या वादातून दोन संघटनेच्या रिक्षा चालकांत हाणामारी झाली होती. याप्रकरणी दोन्ही संघटनेच्या रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. याविरोधात खारघर येथील एकता रिक्षा संघटनेने बंद पुकारला होता. अटक केलेल्या रिक्षा चालकांची जोपर्यंत सुटका होत नाही, तोपर्यंत बंद मागे न घेण्याचा निर्णय संघटनेने जाहीर केला होता. सोमवारी अटक केलेल्या रिक्षा चालकांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली. त्यामुळे बंद मागे घेतला जाईल, अशी सर्वसाधारण अपेक्षा होती. मात्र त्यानंतरही बंद सुरूच ठेवल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. रिक्षा चालकांच्या या मनमानीमुळे नागरिक वेठीस धरले जात आहेत. खारघरमध्ये दररोज हजारो प्रवासी रिक्षाने प्रवास करतात. विशेष म्हणजे रेल्वे स्थानक शहराच्या बाहेर असल्याने तिथपर्यंत जाण्यासाठी रिक्षाचा एकमेव पर्याय आहे.एनएमएमटीच्या बसेस आहेत, परंतु त्याही तुरळक असल्याने प्रवाशांची सर्व मदार रिक्षांवर आहे. अशातच गेल्या आठ दिवसांपासून जवळपास आठशे रिक्षा संपावर गेल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. यासंदर्भात नागरिकांत संताप पसरला असून मनमानी करणाºया रिक्षा चालकांचे परवाने रद्द करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.रिक्षा चालकांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर एनएमएमटीने खारघरमधील बसेसच्या फेºया वाढविल्या आहेत, तर एसटी महामंडळाने खारघर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सेवेसाठी विशेष दोन बस सुरु केल्या आहेत.रिक्षा चालकांच्या मनमानीला चाप बसायला हवा. रहिवाशांना वेठीस धरणे योग्य नाही. यात संबंधित प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे.- किरण कदम, रहिवासी, खारघर सेक्टर ७खारघर व तळोजा येथील रिक्षा संघटनांसमवेत सहायक पोलिस आयुक्त प्रकाश निलेवाड यांची बुधवारी बैठक होणार आहे. या बैठकीत हद्दीवर तोडगा निघाला तरच रिक्षा सुरू होतील, असे खारघर एकता रिक्षा संघटनेने स्पष्ट केले आहे.रिक्षा चालकांच्या बंदबाबत बुधवारी सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या दालनात बैठक बोलावण्यात आली आहे. त्या बैठकीत यासंदर्भात सकारात्मक तोडगा काढला जाईल. चर्चेनंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.- हेमांगिनी पाटील,प्रादेशिक परिवहन कार्यालय, पनवेलसलग सात दिवस रिक्षा बंद ठेवल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे रिक्षा चालकांनीही यासंदर्भात सकारात्मक निर्णय घ्यायला हवा. प्रशासनाने यावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा.- दीपक शिंदे,समाजसेवक,खारघर शहरंरिक्षा चालकांची कृती निंदनीय आहे. संध्याकाळी रेल्वे स्थानकापासून घरापर्यंत पायपीट करावी लागत आहे. बसला गर्दी असते.- रु पाली साटम, खारघर सेक्टर १0
खारघरमध्ये रिक्षा चालकांची मनमानी सुरूच, बंदचा सातवा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 7:13 AM