खारघरच्या विद्यार्थ्यांना वाशीतील क्लबमध्ये मारहाण, मध्यरात्रीची घटना; डान्स पार्टीनंतर बिलावरून झाला वाद
By सूर्यकांत वाघमारे | Published: March 18, 2024 03:47 PM2024-03-18T15:47:14+5:302024-03-18T15:47:52+5:30
याप्रकरणी तिघांवर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : वाशी परिसरात क्लब, पब बेधडक चालत असून त्याठिकाणी वादातून हाणामारीच्या देखील घटना घडत आहेत. रविवारी रात्री अशाच कारणावरून क्लबमध्ये आलेल्या १९ ते २१ वयोगटातील विद्यार्थ्यांना मारहाणीची घटना घडली आहे. बिल भरून झाल्यानंतरही चुकीने दुसऱ्याचे बिल दिल्याने त्यांनी वेटर सोबत वाद घातल्याने क्लबमधील बाउन्सर कडून त्यांना मारहाण झाली आहे. याप्रकरणी तिघांवर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी परिसरात मध्यरात्रीनंतर शहराबाहेरील तरुण तरुणींचे घोळके दिसून येत आहेत. परिसरात चालणाऱ्या क्लब, पार्लर याठिकाणी थिरकण्यासाठी नवी मुंबईसह शहराबाहेरील तरुणांचे घोळके जमत आहेत. रविवारी रात्री इनॉर्बिट मॉलमधील ९ से १२ या क्लबमध्ये खारघर सेक्टर २१ येथील भाऊ बहीण त्यांच्या इतर १९ ते २१ वर्षाच्या मित्रांसह पार्टीसाठी आले होते. मध्यरात्री १२.३० च्या सुमारास बिल दिल्यानंतर वेटरने चुकीने त्यांना परत दुसऱ्या ग्राहकाचे बिल दिले. यामुळे एका विद्यार्थ्याने वेटरला शिवी दिली. यामुळे क्लबमधील वेटर व बाउन्सर यांनी त्याला दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर क्लबच्या बाहेर येऊन त्यांनी पोलिसांना फोन करून मारहाणीची तक्रार केली. त्यानुसार तिघांवर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेवरून क्लब, पब यामध्ये विद्यार्थ्यांच्या मध्यरात्री पर्यंत पार्ट्या चालत असल्याचे दिसून येत आहे. तर शाळा, कॉलेजचे विद्यार्थी मध्यरात्री पर्यंत घराबाहेर राहत असतानाही पालकांचे होणारे दुर्लक्ष चिंतेची बाब आहे.