खारघर, तळोजातील हवा आरोग्यास धोकादायक; केटीसी वेल्फेअरची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 06:10 AM2020-01-28T06:10:20+5:302020-01-28T06:10:28+5:30
खारघरच्या सेक्टर ३४ बी मध्ये मीटर, मशीन, उच्च दर्जाचे सेंसर्स, हवा तपासणीचे मापक, निरिक्षक यंत्रे १६ जानेवारी रोजी दुपारच्या वेळेत बसवण्यात आली होती.
- वैभव गायकर
पनवेल : खारघर, तळोजा शहरातील हवेचा दर्जा अत्यंत सुमार असून ही हवा मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचा दावा केटीसी वेल्फेअर असोसिएशनने केलेल्या हवेतील चाचणीत उघड झाला आहे. प्रदूषणाची माहिती देणाऱ्या सफर एअर कॉलीटी या आॅनलाईन अॅपने देखील सोमवारी हवेचा प्रदूषणाचा दर्जा अत्यंत खराब २९६ एवढा दाखविला आहे.
खारघरच्या सेक्टर ३४ बी मध्ये मीटर, मशीन, उच्च दर्जाचे सेंसर्स, हवा तपासणीचे मापक, निरिक्षक यंत्रे १६ जानेवारी रोजी दुपारच्या वेळेत बसवण्यात आली होती. तळोजा आणि खारघर सीमेवरील भागात ही यंत्रे बसवली होती. खारघर तळोजा कॉलनीज वेल्फेअर असोसिएशची टीम आणि एसजीएस ( महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ व पर्यावरण विभागाची मान्यताप्राप्त प्रयोगशाळा) टीमने विविध ठिकाणावरील हवेची माहिती गोळा केली. एसजीएस टीमने तपासणी ठिकाणांवर दिवस व रात्र हवेच्या दर्जाच्या या यंत्राद्वारे माहिती घेतली. टीमने ८ तासांत तीन नमुने संकलित करण्यात आले. शास्त्रीय पद्धतीने ही माहिती तपासणी यंत्रांमधून जमा करण्यात आली. दुसºया दिवशी हे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला एसजीएसने हा अहवाल प्रकाशित केला. मात्र अहवालात दोन्ही शहरातील हवा मानवी आरोग्यास धोकादायक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. येथील वायूप्रदूषणामुळे स्थानिक नागरिकांना गंभीर आजारांना तोंड द्यावा लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अहवालातील पीएम २.५ आणि पीएम १० या निकषातून असे निदर्शनास आले आहे की, खारघर व तळोजा दोन्ही शहरातील हवेचा दर्जा तिप्पट खराब आहे.
हवेमध्ये घातक अशा कार्बन मोनाक्सईडचे प्रमाण खूप जास्त आहे. एनवो २ चे प्रमाणही खूप मोठे आहे. यामुळे रात्रीच्या वेळी दुर्गंधी पसरते. पहाटेपासून दुपारपर्यंतच्या काळात दूषित हवेचे प्रमाण अधिक असल्याचे या अहवालातून उघड झाले आहे. विशेष म्हणजे याच वेळेला शाळा, महाविद्यालय, कार्यालयांना जाण्यासाठी लोक घराबाहेर पडतात. मॉनिंग वॉकला देखील नागरिक याच वेळेला मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असतात.
या आजारांना निमंत्रण
अशा प्रकारच्या दुषीत हवेने श्वसनाचे आजार, दमा, ह्रदयविकार, चिडचिड होणे यांसारखे आजार उद्भवू शकतात. गर्भवती महिलांना गर्भपाताचा धोका होण्याचीही शक्यता या धोकादायक वातावरणात असतो.
प्रदूषणाची तक्रार थेट मुख्यमंत्र्यांकडे
तळोजा एमआयडीसी मधील प्रदूषणासंदर्भात हरित लवादामध्ये धाव घेतलेले नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी या प्रदूषणासंदर्भात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.