पनवेल : खारघर ते सीबीडी दरम्यान खाडी किनारी २७३ कोटी रुपये खर्च करून सिडकोकडून कोस्टल रोड उभारण्यात येणार आहे. यासाठी आॅगस्टमध्ये निविदा उघडण्यात येणार असून त्यानंतर लगेचच कामाला सुरुवात केली जाणार आहे.
कोस्टल रोडमुळे सायन-पनवेल महामार्गावर खारघर ते सीबीडी दरम्यान होणारी वाहतूककोंडी कमी होईल. तसेच तळोजा आणि खारघरमधील नागरिकांना विनाअडथला नवी मुंबई विमानतळ आणि मुंबईला जाता येणार आहे.
खारघर शहर निर्माण करताना सिडकोने खारघर, तळोजा वसाहतीमधील नागरिकांना मुंबई परिसरात विनाअडथला जाता यावे यासाठी खारघर सेक्टर चौतीस ते स्पॅगेटी वसाहतीपर्यंत चार पदरी रस्ता उभारला आहे. सिडकोने सेक्टर १६ स्पॅगेटी वसाहत, सेक्टर दहा, खारघर स्थानक आणि सीबीडी सेक्टर अकरा खाडी किनारा नवी मुंबई पामबीच मार्ग जाता यावे, यासाठी सिडकोने कोस्टल रोडचे नियोजन केले होते. मात्र खाडीलगत असलेल्या कांदळवनाची होणारी वृक्षतोडीमुळे केंद्रीय पर्यावरण विभागाने यावर बंदी घातली होती. मात्र आता पन्नास मीटरपर्यंत कामे करता येणार असल्याची परवानगी पर्यावरण विभागाकडून मिळाल्यावर सिडकोने हा प्रकल्प हाती घेतला आहे.
स्पॅगेटी वसाहत ते सीबीडी खाडी किनारा दरम्यानच्या रस्त्याला लवकरच परवानगी मिळाल्याने सिडको या रस्त्यासाठी २७३ कोटी रुपये खर्च करणार आहे. तसेच सदर रस्ता बांधकामासाठी काढण्यात आलेल्या निविदेत अनेक मोठ्या कंपन्याकडून प्रतिसाद मिळाला आहे. आॅगस्टमध्ये कोस्टल रोडची निविदा उघडण्यात येणार असून लवकरच कामाला सुरुवात केली जाणार आहे.विमानतळासाठी मार्गखारघर ते सीबीडी दरम्यान कोस्टल रोड झाल्यास सायन - पनवेल महामार्गावर खारघर टोलनाका ते सीबीडी, नेरुळ, सानपाडा दरम्यान होणारी वाहतूककोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. तसेच तळोजा- खारघरमधील नागरिकांना नवी मुंबई विमानतळावर जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होणार आहे.