खारघर टोलनाक्यावर चक्काजाम
By admin | Published: November 10, 2016 03:47 AM2016-11-10T03:47:16+5:302016-11-10T03:47:16+5:30
मंगळवार मध्यरात्रीपासून ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाल्याचे पहावयास मिळाले.
पनवेल : मंगळवार मध्यरात्रीपासून ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतल्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडाल्याचे पहावयास मिळाले. या निर्णयाचा परिणाम सर्वांवरच झाला असून सायन - पनवेल महामार्गावर टोल वसुलीसाठी उभारलेल्या टोल प्लाझावर सुट्या पैशांच्या अभावामुळे दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. गुरु वारी सकाळी ७ च्या सुमारास ही वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावर केवळ अवजड वाहनांकडून टोल वसुली केली जाते, मात्र वाहतूक कोंडीमुळे लहान वाहनांना याचा फटका बसला. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन देखील टोल प्रशासन वाहने सोडत नसल्याने खारघर पोलीस व वाहतूक पोलिसांना याठिकाणी धाव घ्यावी लागली.
५००, १००० रुपयांच्या नोटा बाद झाल्यामुळे सर्वच जण आपल्याकडील या नोटा संपविण्याच्या तयारीत आहेत. मंगळवारी रात्रीपासूनच सर्वच ठिकाणच्या एटीएममध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली. सकाळी घरातून बाहेर पडलेल्या नागरिकांना वाहतुकीचा देखील मोठा अडथळा निर्माण झाला. शाळेच्या बस, मालवाहू गाड्या, अवजड वाहने यांना हा अडथळा निर्माण झाला. खारघर, कामोठे टोल प्लाझावर सुमारे १ ते २ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागून देखील टोल प्रशासनाने वाहने सोडण्यास नकार दिला.
यावेळी वाहतूक कोंडीमुळे अनेक वाहन चालकांनी आपल्या गाड्या विरु द्ध दिशेने चालविल्या. यामध्ये शाळेच्या बसेसचा देखील समावेश होता. त्यामुळे महामार्गावर भीषण आपघाताची शक्यता वर्तविण्यात येत होती. ठरावीक किमीपर्यंत वाहतूक कोंडी झाल्यास टोल वसूल न करता वाहने मोफत सोडण्याचे नियम असून देखील वाहने सोडली जात नव्हती. वाहतूक कोंडीचे छायाचित्र घेणाऱ्या छायाचित्रकाराला देखील टोल प्रशासनाच्या कर्मचाऱ्याकडून अटकाव करण्यात येत होता. मात्र सायंकाळी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आदेश दिल्यानंतर सर्वच वाहनांना टोल न घेता सोडण्यात आले. (प्रतिनिधी)