- वैभव गायकरपनवेल : सायन-पनवेल महामार्गावरील खारघर टोलनाक्यावरील कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभागाने रद्द केले असून, त्याविषयी नोटीस संबंधितांना दिली आहे. सोमवारी मध्यरात्री बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदारांमध्ये टोलचा ताबा सोडण्यावरून वाद झाला, यामुळे एक तास वाहनांना टोलमधून सुटका दिली होती.खारघर टोलनाक्यावर डी. आर. सर्व्हिसेस या कंपनीला १ डिसेंबर २०१८ रोजी टोलवसुलीचा ठेका देण्यात आला आहे. एक महिन्याच्या कालावधीतच सार्वजनिक बांधकाम खात्याने या कंत्राटदाराला ठेका रद्द करण्याची नोटीस बजावली आहे. २५ जानेवारीला कंत्राटदाराला नोटीसदेखील प्राप्त झालेली आहे.दरम्यान, सोमवारी ठेकेदाराला बजावलेल्या नोटीसची मुदत संपल्याचे सांगत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी खारघर टोलनाक्यावरील रात्री ११.३० च्या सुमारास टोलनाक्यावर दाखल झाले. कंत्राटदाराला टोलचा ताबा सोडण्यास सांगितले. कंत्राटदार ताबा सोडण्यास तयार नसल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी व कंत्राटदारात यांच्यात वाद झाला. सुमारे तासभर हा वाद सुरू असताना या वेळात टोलवसुली पूर्णपणे बंद होती. दरम्यान, वाहतूककोंडी वाढल्याने वाहनचालकांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.सोमवारी रात्री उद्भवलेल्या प्रकाराबद्दल सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी अरविंद सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. खारघर टोलनाक्यावरील या प्रकारामुळे पुन्हा एकदा टोलवसुलीचा वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरी सुमारे १६ महिने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मार्फत टोलवसुली सुरू होती. त्यानंतर अवघ्या महिनाभरातच टोल वसूल करणाºया कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली आहे.
खारघर टोलचा ठेका रद्द करण्याची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 11:43 PM