पनवेल : सायन-पनवेल महार्गावरील कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचा वाद अखेर मिटला आहे. मागील अनेक दिवसांपासून रखडलेली टोल हस्तांतराची प्रक्रि या मंगळवारी खारघर पोलिसांच्या उपस्थितीत पार पडली. तीन वेळा ही प्रक्रि या पुढे ढकलण्यात आली होती.
कंत्राटदाराकडे सुमारे दहा कोटी रुपये थकीत असून, वेळेवर पैसे भरत नसल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे, याकरिता मंगळवारी साडेचारच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी टोल ताब्यात घेतला. या वेळी खारघर पोलिसांनी हस्तांतरासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना चोख बंदोबस्त पुरविला होता. बांधकाम खात्याकडून तो एमएसआरडीसीकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी ए. पी. पाटील यांनी दिली. कंत्राटदार कंपनी डी. आर. सर्व्हिसेसच्या माध्यमातून या प्रकरणी न्यायालयात धाव घेण्यात आली होती.