खारघरच्या हायवे ब्रेक हॉटेलला पुन्हा आग, आगीत फर्निचरसह इतर वस्तू खाक
By नारायण जाधव | Published: February 12, 2024 07:15 PM2024-02-12T19:15:28+5:302024-02-12T19:15:58+5:30
पनवेल- शीव महामार्गावर हे हॉटेल असून रविवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास त्याला भीषण आग लागली.
नवी मुंबई : आधी लागलेल्या आगीपासून कोणताही धडा न घेता पुन्हा नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या खारघर येथील हायवे ब्रेक हॉटेल
ला रविवारी मध्यरात्रीच्या सुमारात पुन्हा आग लागली. या आगीत हॉटेलमधील फर्निचर इतर चिजवस्तु खाक झाल्या. २०१९ मध्येही याच हाॅटेलला आग लागली हाेती. मात्र, त्यातून बोध घेऊन अग्निशमन सुविधांत सुधारणा केल्याने रविवारी पुन्हा आग लागली. आगीत कोणाला दुखापत झाली नसली तरी पनेवल महापालिका क्षेत्रातील हॉटेल सुरक्षेचा प्रश्न पु्नहा एकदा ऐरणीवर आला आहे.
पनवेल- शीव महामार्गावर हे हॉटेल असून रविवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास त्याला भीषण आग लागली. याची माहिती मिळताच खारघर अग्निशमन दलाच्या बंबाने दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. सायन-पनवेल महामार्गाला खेटूनच हे हॉटेल असल्याने कोपरा गावासह खारघरवासीयांनी घटनास्थळी गर्दी केली होती. रात्रीच्या वेळी हॉटेल बंद झाल्याने तातडीने हॉटेलच्या व्यवस्थापनाने ते उघडून अग्निशमन दलाच्या जवानांना आत प्रवेश करण्यासाठी वाट करून दिली. मात्र तोपर्यंत आगीत संपूर्ण हाॅटेल खाक झाले होते. ही आग नेमकी अशामुळे लागली याचे कारण अद्याप अग्निशमन यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना समजू शकले नसले तरी व्यवस्थापनाने अग्निशमन नियमावली पायदळी तुडविल्याने ती भडकल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.