वैभव गायकर
पनवेल : खारघरमधील तीन सेक्टरमधून जाणारा दोन किलो मीटर लांबीचा सर्व्हिस कॉरिडोर गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, सिडकोच्या विकास आराखड्यात हा कॉरिडोर आहे. प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी सिमेंटचा भराव करून त्यावर अतिक्रमण करण्यात आल्याचे समोर आले आहे. खारघरमधील एका जागरूक नागरिकाने हा प्रकार उघडकीस आणला आहे.
खारघरमधील जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. सोन्याचे भाव असलेल्या खारघर शहरातील महत्त्वाच्या भागातून जाणारा सुमारे दोन कि.मी.चा सर्व्हिस कॉरिडोर गिळंकृत करण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. उत्सव चौकातून इस्कॉन मंदिराकडे जाणारा सर्व्हिस कॉरिडोर पूर्णपणे गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खारघर शहरात प्रवेश केल्यानंतर काही अंतरावर उत्सव चौक आहे. या चौकातून पांडवमार्ग सुरू होतो. हा मार्ग सेक्टर-२२ प्राइम मॉल, ग्रामविकास भवनकडून इस्कॉन मंदिराकडे जातो. या मार्गालगत मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गाळे, हॉटेल्स उभारले आहेत. विशेष म्हणजे, सिडकोच्या विकास आराखड्यानुसार खारघर सेक्टर-१२ येथील अग्निशमन केंद्रापासून इस्कॉन मंदिराकडे जाणारा (सेक्टर २१, २३) १३ मीटर रुंदीचा व दोन कि.मी. लांबीचा सर्व्हिस रोड अर्थात कॉरिडोर प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, मागील काही वर्षांत त्याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने हा सर्व्हिस कॉरिडोर केवळ कागदावरच सीमित राहिल्याचे दिसून आले आहे. या प्रस्तावित दोन कि.मी.च्या जागेवर सिमेंटचा भराव टाकून व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. खारघरमधील रहिवासी शैलेश क्षीरसागर यांनी ही बाब सर्वप्रथम निदर्शनास आणली आहे. त्यांनी यासदंर्भात अधिक माहिती घेण्यासाठी सिडकोचा २0१८ चा शहर आराखडा तसेच मागील पाच वर्षांपासूनचा गुगल अर्थचा अभ्यास केला आहे. यात प्रस्तावित संपूर्ण कॉरिडोर नष्ट झाल्याचे आढळून आले आहे. क्षीरसागर यांनी यासंदर्भात २४ आॅक्टोबर रोजी सिडकोच्या अतिक्र मण विभागाला माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला. ही माहिती उपलब्ध झाल्यास खारघरमधील सर्व्हिस कॉरिडोरचा मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता क्षीरसागर यांनी व्यक्त केली आहे.सर्व्हिस कॉरिडोर असल्याची सिडकोची कबुलीसिडकोच्या परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकारी गीता पिल्लई यांनी या ठिकाणी सर्व्हिस कॉरिडोरचे नियोजन असल्याची कबुली दिली आहे. या रस्त्यावर अतिक्र मण झाल्याचेही त्यांनी मान्य केले असून, नियोजित जागेवर आता वाहनतळ उभारण्याची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीखारघरमध्ये जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या असताना, अशाप्रकारे सिडको प्रशासनाची डोळेझाक करून बेकायदेशीर जागा हडप करणाºयांवर सिडकोने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संबंधित घोटाळा उघडकीस आणणाºया शैलेश क्षीरसागर यांनी केली आहे.खारघर शहरातून जाणारा या पांडवमार्गावर मोठ्या प्रमाणात उच्च पदस्त नागरिकांची रहिवासी संकुले आहेत. नामांकित बांधकाम व्यावसायिकांनी या ठिकाणी टोलेजंग इमारती उभारल्या आहेत. तसेच हॉटेल्स, फर्निचरची दुकाने, मोबाइल शॉप्स, कार सेलिंगच्या दुकानांचा यात समावेश आहे. सिडकोच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण सर्व्हिस कॉरिडोर व्यावसायिकांनी गिळंकृत केल्याचे दिसून आले आहे.