खारघर अत्याधुनिक कार्पोरेट पार्क दृष्टिपथात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:07 AM2017-07-19T03:07:22+5:302017-07-19T03:07:22+5:30

मुंबईतील बांद्रा-कुर्ला वाणिज्य संकुलाच्या धर्तीवर खारघर येथे अत्याधुनिक दर्जाचे कार्पोरेट पार्क (केपीसी) उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

Khargha's state-of-the-art corporate park is in sight | खारघर अत्याधुनिक कार्पोरेट पार्क दृष्टिपथात

खारघर अत्याधुनिक कार्पोरेट पार्क दृष्टिपथात

Next

- कमलाकर कांबळे । लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबईतील बांद्रा-कुर्ला वाणिज्य संकुलाच्या धर्तीवर खारघर येथे अत्याधुनिक दर्जाचे कार्पोरेट पार्क (केपीसी) उभारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यादृष्टीने प्राथमिक कार्यवाही सुरू करण्यात आली असून स्पर्धा प्रक्रियेतून निवड करण्यात आलेल्या सात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वास्तुविशारदांना नियोजित कार्पोरेट पार्कचा आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच हा प्रकल्प आकारास येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई परिसरात मोठमोठे आंतरराष्ट्रीय प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प, जेएनपीटी, प्रस्तावित शिवडी सी लिंक, मेट्रो या प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच खारघर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फ कोर्स उभारण्यात आले आहे.या सर्व प्रकल्पांमुळे नवी मुंबईकडे एक नवे आर्थिक केंद्र म्हणून पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर बीकेसीच्या धर्तीवर नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय वाणिज्य संकुल उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुसार खारघर येथील सेंट्रल पार्कच्या बाजूला १२0 हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्पोरेट पार्क उभारण्याचा निर्णय जानेवारी २0१६ मध्ये घेतला होता. गेल्या दीड वर्षात या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सकारात्मक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जानेवारी २0१७ मध्ये या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात आली होती. त्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकूण २४ वास्तुविशारदांनी भाग घेतला होता. त्यांना विकास आराखड्याच्या संकल्पना सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. स्पर्धात्मक प्रक्रियेतून प्राप्त झालेल्या सात कंपन्यांच्या विकास आराखड्यांची सिडकोने निवड केली आहे. निवड करण्यात आलेल्या या सात वास्तुविशारदांना आपले अंतिम आराखडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्राप्त होणाऱ्या सात आराखड्यांतून सर्वोत्तम आराखड्याची निवड करून या प्रकल्पाचा अंतिम आराखडा तयार करण्याचे काम त्याच्यावर सोपविले जाणार आहे. दरम्यान, निवड झालेल्या या सात वास्तुविशारद कंपन्यांत पाच राष्ट्रीय व दोन आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांना पुढील सहा महिन्यांत आराखडा सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाबरोबरच या कार्पोरेट पार्कचे काम सुरू करण्याची योजना असल्याची माहिती सिडकोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. मोहन निनावे यांनी दिली.

निवड झालेले सर्वोत्तम सात वास्तुविशारद
स्पर्धात्मक प्रक्रियेतून मागविण्यात आलेल्या प्रस्तावाला सिंगापूर, नेदरलँड, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्समधील वास्तुविशारद कंपन्यांनी भाग घेवून विकास आराखड्याचे प्रारूप सादर केले होते. तर नवी दिल्ली, मुंबई व बंगळुरूमधील काही वास्तुविशारदांनी परदेशी कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करून आपले आराखडे सादर केले होते. या स्पर्धात्मक प्रक्रियेत १४ आंतरराष्ट्रीय तर १३ राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांनी भाग घेतला होता. त्यापैकी सुरबना जुराँग कन्सल्टंट प्रा. लि. (बंगळुरू), डीडीजी बाल्टीमोर (अमेरिका), डब्लूएस अ‍ॅटकीन्स इंडिया प्रा. लि. (नवी दिल्ली), ईडीआयएफआयसीई कन्सल्टंट प्रा. लि. (मुंबई),बीडीपी नवी दिल्ली आणि एनबीबीजे नेलसॉफ्ट या सात कंपन्यांचे आराखडे अंतिम फेरीसाठी ग्राह्य धरण्यात आले आहे. या कंपन्यांना सर्वोत्तम आराखडे सादर करण्यासाठी संमतीपत्रे देण्यात आले असून पुढील सहा महिन्यांत ते सादर करण्यास सूचित करण्यात आले आहे.

केपीसीची वैशिष्ट्ये...
बीकेसीपेक्षा वेगळे असणार केपीसी
बहुतांशी इमारती पिरॅमिडच्या आकारात बांधण्याची संकल्पना
परदेशातील नाइट लाइफच्या धर्तीवर दुकाने व व्यावसायिक गाळ्यांची रचना
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून १२.५ किलोमीटरचे अंतर
खारघर रेल्वे स्थानकापासून केवळ ५ किमीचे अंतर
मेट्रो स्थानकापासून हाकेच्या अंतरावर
सायन-पनवेल महामार्गापासून १.५ कि.मी. अंतर

Web Title: Khargha's state-of-the-art corporate park is in sight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.