खतकुंड्या बनल्या कचराकुंड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 01:57 AM2018-08-06T01:57:27+5:302018-08-06T01:57:30+5:30
पनवेल महानगरपालिकेने स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी खतकुंड्या उभारल्या होत्या
- अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : पनवेल महानगरपालिकेने स्वच्छता सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी खतकुंड्या उभारल्या होत्या; परंतु आता या खतकुंड्यांचे रूपांतर कचराकुंड्यांत झाल्याचे दिसून आले आहे. खतनिर्मितीच्या हेतूने निर्माण करण्यात आलेल्या कुंड्यांत आता कचरा साठविला जात असल्याने महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात गेल्याची चर्चा पनवेलमध्ये सुरू आहे.
पनवेल महानगरपालिकेने महत्त्वाच्या ठिकाणी खतकुंड्या बांधल्या आहेत, त्यामध्ये पनवेल शहर, छोटा आणि मोठा खांदा, कळंबोली, कामोठे तसेच काही समाविष्ट गावांमध्ये ५० पेक्षा जास्त खतकुंड्या बांधण्यात आल्या आहेत. आणखी काही ठिकाणी त्या बांधण्यात येणार आहेत. प्री कास्ट पॅनेलच्या माध्यमातून या कंपोस्टिंग बिन्स तयार करण्यात आल्या आहेत. या पाठीमागे ओला कचरा त्याचबरोबर पालापाचोळ्यावर कंपोस्ट खतनिर्मितीचा संकल्प करण्यात आला होता, यातून निर्माण होणाऱ्या खताचा वापर उद्यान, गार्डन तसेच झाडांसाठी करण्यात येणार होता. त्याचबरोबर जास्त खत निर्माण झाले तर त्याची विक्र ी करून उत्पन्न मिळविण्याचे ध्येय होते.
मात्र, पनवेल शहरात तसेच महापालिका हद्दीत फेरफटका मारला तर या प्री कास्ट कंपोस्टिंग बिन्समध्ये कचरा टाकला जात असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, शेजारच्या भिंतीवर कचरा घंटागाडीतच टाका, इतरत्र टाकल्यास १५० रुपये दंड आकारला जाईल, असा संदेश लिहिण्यात आला आहे.
>आपल्या परिसराची स्वच्छता राखणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. त्यासाठी प्रशासनाने खतकुंड्या तयार केल्या आहेत. यात ओला आणि सुका कचरा वेगळा करून टाकणे अपेक्षित आहे; परंतु खतकुंड्यात प्लॅस्टिक, टायर अशा प्रकारे सुका कचरा टाकला जातो. त्यासाठी जनजागृतीची गरज असून यासंदर्भात महापालिकेच्या वतीने लवकरच उपाययोजना करण्यात येतील.
- डॉ. अरु णकुमार भगत, आरोग्य सभापती
>सहायक आयुक्त अनभिज्ञ
घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सहायक आयुक्त श्याम पोशेट्टी यांच्यावर देण्यात आली आहे. महापालिकेने किती खतकुंड्या बांधल्या, त्यातून किती कंपोस्ट खत तयार झाले, याबाबत पोशेट्टी यांना विचारले असता, याबाबत आपल्याला काहीच माहीत नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षणाकरिता या खतकुंड्या बांधून सेल्फीगिरी करण्यात आली, पुढे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कचराकुंड्या तर सोडाच; पण इतर प्रकल्पसुद्धा बंद पडायला लागले आहेत, याला सत्ताधारी आणि प्रशासन जबाबदार आहे. - अरविंद म्हात्रे, नगरसेवक