खोपोली नगरपरिषद प्रथम
By Admin | Published: May 5, 2017 06:08 AM2017-05-05T06:08:52+5:302017-05-05T06:08:52+5:30
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याने मागवलेल्या अहवालानुसार शासनाच्या विविध योजना राबविताना उत्कृष्ट कार्य करणाऱ्या
वावोशी : महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याने मागवलेल्या अहवालानुसार शासनाच्या विविध योजना राबविताना उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नगरपालिकांना रोख रक्कम घोषित करण्यात आली. यात कोकण विभागातून खोपोली पालिकेने ‘ब’ वर्ग श्रेणीतून पहिला क्र मांक पटकावून तीन कोटींचे पारितोषिक नगरविकास खात्याने घोषित केले. गुरु वारी एका समारंभात हा पुरस्कार खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत, उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकारला.
राज्य शासनाच्या नगरपरिषद संचालनालय (वरळी मुंबई) कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नगरपरिषद, नगरपंचायती यांचा सन्मान करण्याबाबत अध्यादेश काढला होता. याकरिता राज्यभरात जिल्हास्तरीय निवड समितीही गठीत करण्यात आली होती. समितीने १० एप्रिल रोजी आपला अहवाल नगरविकास खात्याकडे सुपूर्द केला. यात कोकण विभागातून पाच नगरपरिषदांना पुरस्कार घोषित झाले. यात खोपोलीचा पहिला क्र मांक घोषित झाला. या पुरस्कारासोबत तीन कोटी रु पयांची रक्कम नगरपरिषदेस मिळणार आहे. नगरपरिषदांमध्ये ‘अ’ वर्ग नगरपरिषदांना चार कोटी, ‘ब’ नगरपरिषदांना तीन कोटी व ‘क’ नगरपरिषदांना दोन कोटी असा निकष राज्य शासनाने लावला आहे.
राज्य व केंद्र शासनाने राबविलेल्या विविध योजना यात स्वच्छ महाराष्ट्र मिशन, शहरातील जनगणनेनुसार लोकसंख्या आधारित मालमत्ता कर माहिती, आरोग्यविषयक माहिती यात, घंटागाडीची संख्या, बायोगॅस प्रकल्प, राज्य व केंद्र शासनाच्या विविध विकास योजना, पाणीपुरवठा योजना, नागरी दुर्बल घटकांसाठी राबविलेल्या योजना, वृक्ष गणना व लागवड आदी संबंधीची माहिती राज्य शासनाने मागविली होती. या माहितीच्या आधारे निवड समितीने अभ्यास करून खोपोली पालिकेला ब वर्ग नगरपालिकेत प्रथम क्र मांकाचे पारितोषिक घोषित केले.
खोपोली मुख्याधिकारी डॉ.दीपक सावंत यांना पारितोषिक घोषित झाल्याचा दूरध्वनी बुधवारी दुपारी मंत्रालयातून आला होता. या पारितोषिकाचे वितरण गुरु वारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. दरम्यान, पालिकेला मानाचा पुरस्कार व तीन कोटींचे पारितोषिक मिळाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसूरकर यांनी नगराध्यक्षा सुमन औसरमल व मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत, उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, सर्व नगरसेवक, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. (वार्ताहर)
खोपोली नगरपरिषदेला हा पुरस्कार २०१६-१७ मधील कामगिरीच्या अहवालावरून प्राप्त झाला आहे. या दरम्यान तत्कालीन नगराध्यक्ष दत्ता मसूरकर यांच्या नेतृत्वाखाली उपनगराध्यक्ष रमेश जाधव, सर्व समिती सभापती, नगरसेवक यांनी मुख्याधिकारी डॉ. दीपक सावंत यांच्याबरोबर अतिशय नियोजनबद्धरीत्या काम केले व विविध योजनांची खोपोलीत अंमलबजावणी केली म्हणून हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार. यापुढेही नगरपरिषद अशा प्रकारे उत्कृष्ट कामकाज करणार असून, येथील नागरिकांना उत्तम सेवा देऊन शहराचा विकास करणार.
- सुमन औसरमल, नगराध्यक्षा, खोपोली नगरपालिका