खारघर कार्पोरेट पार्कच्या निविदा लवकरच; सिडकोने कसली कंबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:28 PM2020-01-01T23:28:14+5:302020-01-01T23:28:21+5:30
मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर १२० हेक्टर जागेवर उभारणार प्रकल्प
- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर खारघर येथे अत्याधुनिक दर्जाचे कार्पोरेट पार्क (केसीपी) प्रस्तावित करण्यात आले आहे. विविध कारणांमुळे मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला नवीन वर्षात गती देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार पुढील दोन-तीन महिन्यांत खारघर कार्पोरेट पार्कसाठी निविदा काढल्या जाणार आहेत, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ‘लोकमत’ला दिली.
सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई परिसरात मोठमोठे अंतरराष्ट्रीय प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प, जेएनपीटी, प्रस्तावित शिवडी सी लिंक, मेट्रो या प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच खारघर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फ कोर्स उभारण्यात आले आहेत. या सर्व प्रकल्पांमुळे नवी मुंबईकडे एक नवे आर्थिक केंद्र म्हणून पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर बीकेसीच्या धर्तीवर नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय वाणिज्य संकुल उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुसार खारघर येथील सेंट्रल पार्कच्या बाजूला १२० हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्पोरेट पार्क उभारण्याचा निर्णय जानेवारी २०१६ मध्ये घेण्यात आला होता. जानेवारी २०१७ मध्ये या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धात्मक प्रक्रियेतून प्राप्त झालेल्या सात कंपन्यांच्या विकास आराखड्यांची सिडकोने निवड केली होती. निवड करण्यात आलेल्या या सात वास्तुविशारदांना आपले अंतिम आरखडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्राप्त झालेल्या सातपैकी एका उत्कृष्ट वास्तुविशारद व सल्लागार कंपनीची निवड करण्यासाठी सिडकोने पाच तज्ज्ञांची एक समिती गठीत केली होती.
या समितीने सिंगापूरच्या ईडीबी डिझायनर या कंपनीच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यानुसार प्रस्तावित कार्पोरेट पार्कचा आराखडा तयार करण्यासाठी ईडीबी डिझायनर या कंपनीची गेल्या वर्षी नियुक्ती करण्यात आली होती. या कंपनीने कार्पोरेट पार्कचा अत्याधुनिक स्वरूपाचा आराखडा तयार करून अलीकडेच सिडकोला सादर केला आहे. त्यानुसार कार्पोरेट पार्कमध्ये आपले कार्यालय सुरू करू इच्छिणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्पोरेट उद्योजकांना पाचारण केले जाणार आहे. त्यासाठी पुढील दोन-तीन महिन्यांत निविदा काढल्या जाणार असल्याचे लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले आहे.
केसीपीची वैशिष्ट्ये
पाच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट
बहुतांशी इमारती पिरॅमिडच्या आकारात बांधण्याची संकल्पना
परदेशातील नाइटलाइफ धर्तीवर दुकाने व व्यावसायिक गाळ्यांची रचना
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून १२.५ किलोमीटरचे अंतर
खारघर रेल्वे स्थानकापासून केवळ ५ कि.मी.चे अंतर
मेट्रो स्थानकापासून हाकेच्या अंतरावर
सायन-पनवेल महामार्गापासून १.५ कि.मी. अंतर