कोलकातामधील अपहृत मुलीची सुटका, सहा तासांत केली आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 12:52 AM2019-06-30T00:52:18+5:302019-06-30T00:52:58+5:30

हबीबमुल्ला अंचर मुल्ला (२८) असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

Kidnapped daughter in Kolkata, arrested in six hours, accused | कोलकातामधील अपहृत मुलीची सुटका, सहा तासांत केली आरोपीला अटक

कोलकातामधील अपहृत मुलीची सुटका, सहा तासांत केली आरोपीला अटक

Next

नवी मुंबई : कोलकाता येथून नोकरीच्या आमिषाने पळवून आणलेल्या १५ वर्षीय मुलीची पोलिसांनी उलवे येथून सुटका केली आहे. दिल्ली येथील एका संस्थेमार्फत पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळाली होती. त्यानुसार तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी सदर मुलीचा शोध घेऊन अवघ्या सहा तासांत तिची सुखरूप सुटका केली.
हबीबमुल्ला अंचर मुल्ला (२८) असे पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार अशरफउल शाएब मोल्ला उर्फ बाबू हा पश्चिम बंगालला पळाला असून कोलकाता पोलीस त्याचा शोध घेत आहेत. १५ वर्षांची पीडित मुलगी ही कोलकातामधील चोवीस परगना परिसरात राहणारी आहे. हबीबमुल्ला हादेखील त्याच परिसरातील राहणारा असल्याने दोघांची ओळख होती.
या ओळखीतून हबीबमुल्ला व अशरफउल या दोघांनी सदर अल्पवयीन मुलीला मुंबईत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले होते. यानंतर तिला उलवे येथील बामणडोंगरी परिसरात ठेवण्यात आले होते. तर तिला नवी मुंबईत सोडल्यानंतर अशरफउल हा पुन्हा पश्चिम बंगालला पळून गेला होता. सदर अल्पवयीन मुलीला नोकरीचे आमिष दाखवून अनैतिक धंद्यासाठी वापरण्याचा त्यांचा
कट होता.
तत्पूर्वीच सदर मुलीच्या अपहरणाची माहिती दिल्ली येथील शक्ती वाहिनी या सामाजिक संस्थेने नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्या ई-मेलवर कळवली होती. त्यानुसार गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे
वरिष्ठ निरीक्षक अर्जुन
गरड यांनी सहायक निरीक्षक सुनीता भोर, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, जे. ए. सूर्यवंशी आदीचे पथक तयार केले होते. त्यांनी तांत्रिक तपासाद्वारे उलवे सेक्टर १९ येथे झाडाझडती घेतली असता, हबीबमुल्ला याच्या घरात ती आढळून आली. या वेळी तिची सुखरूप सुटका करून पोलिसांनी हबीबमुल्ला याला
अटक केली.

दोन आठवड्यात पाच मुलींची सुटका
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने मागील दोन आठवड्यात उलवे येथील घटनेसह इतर चार गुन्ह्यांचा उलगडा करून अपहृत अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. कल्याण, औरंगाबाद, नेरुळ यासह कळंबोली परिसरातून या मुलींचा शोध घेण्यात आला. विविध कारणांनी या मुलींना फूस लावून पळवण्यात आले होते. मात्र, त्यासंबंधीची तक्रार प्राप्त होताच गुन्हे शाखेच्या पथकाने चारही गुन्ह्यातील मुलींची सुटका करून संबंधितांना अटक केले आहे. या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीसठाण्यात दोन तर नेरुळ व कळंबोलीतही गुन्हा दाखल आहे.

Web Title: Kidnapped daughter in Kolkata, arrested in six hours, accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.