अपहृत मुलगी सापडली, सानपाड्यामधील घटना; चौकशी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 05:16 IST2018-03-03T05:16:44+5:302018-03-03T05:16:44+5:30
सानपाडा येथून शुक्रवारी अपहरण झालेली मुलगी घटनास्थळापासून काही अंतरावरील मेडिकल स्टोअरमध्ये सापडली.

अपहृत मुलगी सापडली, सानपाड्यामधील घटना; चौकशी सुरू
नवी मुंबई : सानपाडा येथून शुक्रवारी अपहरण झालेली मुलगी घटनास्थळापासून काही अंतरावरील मेडिकल स्टोअरमध्ये सापडली. पोलिसांनी चौकशीसाठी तिला ताब्यात घेतले असून नेमका काय प्रकार आहे याची पोलीस चौकशी करत आहेत.
सानपाडा परिसरातून १४ वर्षीय मुलीच्या अपहरणाची घटना शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. देवदर्शनासाठी ती लहान भावासोबत गेली होती. तिला जबदस्तीने कारमध्ये कोंबून पळविण्यात आल्याचे तिच्या लहान भावाने सांगितले.
सानपाडा पोलिसांकडे तिच्या अपहरणाची तक्रार प्राप्त होताच गुन्हे शाखा व परिमंडळ पोलिसांची तपास पथके तयार करण्यात आली होती, तर पोलिसांकडून तपासात विलंब होत असल्याच्या कारणावरून संतप्त नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी पामबीच मार्गावर रास्ता रोकोदेखील केला.
या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू असतानाच सुमारे तीन तासांनी ती घटनास्थळापासून काही अंतरावरच एका मेडिकल स्टोअरमध्ये असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी तिला याबाबत विचारले असता ज्यांनी अपहरण केले त्यांनीच वाशीला सोडून दिले. त्यानंतर मी येथपर्यंत आल्याचे तिने सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.