लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : तुर्भे एमआयडीसी येथून पळवलेल्या अल्पवयीन मुलीचा एक वर्षांनी शोध लागला आहे. शासन निर्देशानुसार पोलिसांकडून राबवल्या जात असलेल्या, ‘आॅपरेशन मुस्कान-३’अंतर्गत गुन्हे शाखा पोलिसांनी हिंगोलीमधून या मुलीचा शोध घेतला. एका तरुणाने तिला फूस लावून पळवून नेले होते.राजू केशवे (२२), असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने तुर्भे येथून १६ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होऊनही त्यांचा तपास लागला नव्हता. अखेर तब्बल एक वर्षांनी गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने या प्रकरणाचा छडा लावला आहे. पळवलेल्या अल्पवयीन मुलीची हिंगोली येथून सुटका करून तरुणाला अटक केली आहे. राजू याने परिचयाचा गैरफायदा घेत तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. यानंतर हिंगोली येथे तो वीटभट्टीवर काम करत होता. त्याच्या या सध्याच्या ठिकाणाची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, हवालदार हनुमंत शितोळे, जगदीश पाटील, राजेश कोकरे यांचे पथक परभणीला रवाना झाले होते. त्यांनी सलग तीन दिवस शोध घेऊन राजूला अटक करून त्याच्या तावडीतून अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. राज्यात १ ते ३१ जुलैदरम्यान, ‘आॅपरेशन मुस्कान-३’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत शहरातून बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्याची विशेष मोहीम पोलिसांकडून राबवली जाणार आहे.
अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका
By admin | Published: July 04, 2017 7:23 AM