नवी मुंबई - खैरणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकावर अपहरण आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे त्यांच्यावरील संभाव्य कारवाईच्या शक्यतेमुळे परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. खैरणे येथे राहणाऱ्या सुफियाना शेख या रिक्षाचालकाचे अपहण करून मारहाण केल्यापकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. 2 नोंव्हेंबर रोजी खैरणेतील रिक्षा स्टॅण्डवर हा प्रकार घडला होता. सुफियांना हा तिथल्या स्टॅण्डवर रिक्षा घेऊन गेलेला. यावेळी तिथल्या काही तरुणांनी सुफियाना याला स्टॅण्डवर रिक्षा लावण्यास विरोध केला.
यानंतर त्याला नगरसेवक मुलांवर पटेल यांच्या कार्यालयात नेले असता त्याठिकाणी मुनावर पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी जबर मारहाण केली. घडलेल्या प्रकाराची तक्रार सुफियानाच्या आई साहिदा शेख यांनी कोपर खैरणे पोलिसांकडे केलेली. परंतु कोपर खैरणे पोलिसांकडून संबंधितांवर कारवाई होत नसल्याने त्यांनी पोलीस आयक्त संजय कुमार यांच्याकडे तक्रार केलेली. त्यानुसार नगरसेवक पटेल व इतर आठ जणांविरोधात अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. परंतु मुनावर यांनी आरोप फेटाळून आपल्याला गुंतवण्याचे षडयंत्र झाल्याचा आरोप केला आहे.
या प्रकारामुळे खैरणे परिसरात सोमवारी रात्रीपासून तणाव निर्माण झालेला. मुनावर यांच्या विरोधी गटाने शेख कुटुंबाला मदत केल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यावरून पूर्ववैमनस्य असलेले हे दोन्ही गट समोरासमोर येऊन दंगा होण्याची शक्यता असल्याने खैरणे परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे.