बालपणाचे अपहरण; तीन वर्षांमध्ये ७२६ मुले गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 03:20 AM2018-07-24T03:20:01+5:302018-07-24T03:20:30+5:30

५०० अल्पवयीन मुलींचा समावेश

Kidnapping of childhood; 726 children missing in three years | बालपणाचे अपहरण; तीन वर्षांमध्ये ७२६ मुले गायब

बालपणाचे अपहरण; तीन वर्षांमध्ये ७२६ मुले गायब

Next

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : पनवेल, नवी मुंबईसह उरण परिसरामध्ये अल्पवयीन मुले घर सोडून जाण्याचे व त्यांचे अपहरण होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तीन वर्षांमध्ये ७२६ मुले गायब झाल्याच्या घटना घडल्या असून त्यामध्ये ५०० मुलींचा समावेश आहे. मुलींच्या अपहरणातील ४५८ गुन्ह्यांचा उलगडा करण्यात यश आले असून बहुतांश घटना प्रेमप्रकरण व कौटुंबिक वादातून घडत असल्याचे उघडकीस आले आहे.
मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच अल्पवयीन मुली संशयास्पदरीत्या बेपत्ता होण्यामुळे पालकांपुढील चिंता वाढत आहे. मागील काही वर्षांत अज्ञातांकडून घडलेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या घटनांमुळे मुली बेपत्ता होण्याच्या प्रकारांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी बेपत्ता झाल्यास अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास केला जातो. त्यानुसार मागील तीन वर्षांत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातून एकूण ७२६ अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी ५०० गुन्हे मुलींच्या अपहरणाचे असून ४५८ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या मुलींचा राज्यासह देशाच्या विविध भागातून शोध घेवून त्यांना पळवून नेणाऱ्यांना कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान सर्वाधिक मुली प्रेमप्रकरणातून लग्नाच्या आमिषाला भुलून मुलांसोबत पळून गेल्याचे समोर आले आहे. मुलींप्रमाणेच शहरातून तीन वर्षात २२६ मुलांच्या अपहरणाची नोंद पोलिसांकडे असून, त्यापैकी २१६ मुलांचा पोलिसांनी शोध घेवून पालकांच्या ताब्यात दिले आहे.
अल्पवयीन मुलगा-मुलगी बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांचा शोध घेण्याचे पोलिसांकडून कसून प्रयत्न होतात. परंतु चार महिन्यानंतरही त्यांचा शोध न लागल्यास हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपासासाठी वर्ग केला जातो, अथवा संयुक्तरीत्या तपास केला जातो. त्यानुसार या पथकाने मागील तीन वर्षात स्वतंत्रपणे ६५ मुला-मुलींचा शोध घेतला आहे. यामुळे शहरातून जरी अल्पवयीन मुले-मुलींच्या अपहरणाचे प्रकार घडत असले, तरीही पोलिसांकडून त्याचा उलगडा करण्याचे कौशल्य दाखवले आहे. मात्र अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्यामागे सर्वाधिक प्रेमप्रकरणाचे कारण समोर येत असल्याचे गांभीर्य देखील पोलिसांकडून व्यक्त होत आहे. प्रेमसंबंधातून लग्नाचे आमिष दाखवून त्यांना पळवून नेले जात आहे. अशा काही घटनांमध्ये परराज्यातील तरुणांची टोळी असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. यामुळे अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून परराज्यात पळवून नेण्यामागे टोळी सक्रिय असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

संवाद हरवतोय
धावपळीच्या जीवनामध्ये पालक व मुलांमधील संवाद हरवू लागला आहे. पौगांडावस्थेमध्ये आलेल्या मुलांना पुरेसा वेळ पालकांकडून दिला जात नाही. यामुळे संवाद तुटतो व पुढे प्रेमप्रकरण किंवा मुलांच्या इतर तक्रारींमुळे घरांमध्ये भांडणे सुरू होत आहेत. यामुळे मुले घर सोडण्याचा निर्णय घेत असून पालकांनीही घरातील संवाद वाढविण्यावर लक्ष देण्याची गरज आहे.

सामाजिक जबाबदारी
घर सोडून जाणाºया मुलांची संख्या वाढत आहे. अपहरणाचे गुन्हे दाखल झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र पथक तयार केले आहे. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेवून येणाºया मुलांना समजावण्याचे कामही पोलीस करत आहेत.

समुपदेशन केंद्रांची गरज
अल्पवयीन मुले व मुलींच्या अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. ९० टक्के मुलींना लग्नाचे आमिष दाखविल्यामुळे त्या घर सोडून गेल्याचे निदर्शनास येवू लागले आहे. घरातील भांडणांमुळेही लहान मुले, मुली घर सोडून जात आहेत. पालकांनी समजावून सांगितलेले मुले ऐकत नाहीत. घर सोडण्यास तयार होणाºया या मुलांना समुपदेशनाची अत्यंत गरज आहे. योग्य समुपदेशन केल्यास यामधील बहुतांश घटना कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Kidnapping of childhood; 726 children missing in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.